फ्लू लशीबाबत डॉक्टरही उदासीन
By Admin | Published: October 15, 2016 02:31 AM2016-10-15T02:31:42+5:302016-10-15T02:31:42+5:30
स्वाईन फ्लू या आजाराचा उद्रेक काही वर्षांपासून देशात आणि राज्यात झालेला असताना सामान्य महिला आणि डॉक्टरांमध्येही या आजाराच्या
पुणे : स्वाईन फ्लू या आजाराचा उद्रेक काही वर्षांपासून देशात आणि राज्यात झालेला असताना सामान्य महिला आणि डॉक्टरांमध्येही या आजाराच्या लसीकरणाबाबत जनजागृती नसल्याचे चित्र एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे या आजाराबाबत अद्यापही भारतात जागृती नसल्याचे मत सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी नोंदवले आहे.
महाराष्ट्र मानव विज्ञान परिषद आणि स्विस ट्रॉपिकल अँड पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट यांनी संयुक्तरीत्या केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. हे सर्वेक्षण जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार करण्यात आल्याचे संस्थांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
सर्वेक्षण करण्यात आलेल्यांपैकी ९० टक्क्यांहून अधिक जणांचे शिक्षण हे दहावी किंवा त्याहून कमी असल्याचे संस्थांनी नोंदविले आहे. यातील अनेक जणी आपल्या बालकाच्या लसीकरणाबाबत जागृत होत्या, मात्र गरोदरपणात फ्लूची लस घ्यायची असते याबाबत त्यांना माहीत नसल्याचे आढळले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी अनेकांनी आपल्याला फ्लूच्या लशीबाबत माहिती नसल्याने किंवा अर्धवट माहिती असल्याने आपण ही लस घेत नसल्याचे सांगितले.
बहुतांश महिलांनी आणि त्यांच्या पतीने आपल्याला डॉक्टरांनी या लशीबाबत माहितीच दिली नसल्याचे सांगितले. याशिवाय डॉक्टरांमध्येही गरोदरपणातील फ्लू गंभीर आहे की नाही याबाबत संभ्रम होता. अनेकदा आपण दिलेला फ्लू लसीकरणाचा सल्ला गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून गांभीर्याने घेतला जात नसल्याचे सांगितले. अनेक डॉक्टरांनी या लशीबाबत अनेक शंका असल्याने आपण आपल्या दवाखान्यात ही लस देत नसल्याचे सांगितले.
पुण्यातील औंध, बाणेर, गोखलेनगर आणि कोथरूड भागातील १८ ते ३५ वयोगटातील ६० महिलांच्या सर्वेक्षणातून संस्थेने आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. ६०पैकी ३० महिलांच्या जोडीदारांच्या मुलाखतींचाही या सर्वेक्षणात समावेश आहे. याशिवाय शहराच्या याच भागातील ३० डॉक्टरांच्याही यामध्ये मुलाखती घेण्यात आल्या.
काही वेळा फ्लू गंभीर रूप धारण करत असल्याने गर्भवती महिला आणि त्यांच्या बालकाचे फ्लूपासून रक्षण व्हावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने फ्लू आजाराविरोधी लसीकरण करण्याची शिफारस केली होती. सन २००९मध्ये पुण्यात आलेल्या स्वाईन फ्लूच्या साथीमुळे या आजाराचे प्रमाण गर्भवती महिला आणि बालकांमध्ये अधिक असल्याचे आढळून आले होते. (प्रतिनिधी)