डॉक्टरांनी चमत्कार केला, आता‘राधा’लाही डॉक्टरच करायचंय...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 05:38 PM2018-12-13T17:38:55+5:302018-12-13T17:46:03+5:30
‘राधा’ म्हणजे प्रत्यारोपित गर्भाशयातून जन्माला आलेले देशातील पहिले बाळ...
पुणे : दोन मुले जन्माला येण्यापुर्वीच दगावली, तर जन्म झाल्यानंतर काही दिवसांतच दोघांचा मृत्यू झाला... अनेक यातना सहन केलेल्या या मातेला गर्भाशय प्रत्यारोपणातून पुन्हा आशेचा किरण दिसला. काही दिवसात ‘राधा’ जन्माला आली. या मातेसाठी हा चमत्कार होता, डॉक्टरांनी केलेला. आता ‘राधा’लाही डॉक्टरच करायचे, असा निर्धार करत या मातेने तिच्यासह पुण्याला सलाम करत गुजरातची वाट धरली.
‘राधा’ म्हणजे प्रत्यारोपित गर्भाशयातून जन्माला आलेले देशातील पहिले बाळ. ज्या गर्भाशयातून तिच्या आईचा जन्म झाला. त्याच गर्भाशयातून तिचाही जन्म झाला आहे. पुण्यातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमधे दि. १८ आॅक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी तिचा जन्म झाला.तिची आई मीनाक्षी (वय २८) व वडील हितेश वालंद हे गुजरातचे राहणारे. फेब्रुवारी महिन्यापासून ते रुग्णालयात होते. जन्मानंतर मुलींची प्रकृती स्थिर होईपर्यंत रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने तिची काळजी घेतली. तिची तब्बेत आता ठणठणीत असून मागील दहा महिन्यांचा खडतर प्रवास संपवून गुरूवारी (दि. १३) आई-वडिलांसह राधा गुजरातमधील आपल्या घराकडे रवाना झाली.
मीनाक्षी यांचा दोन वेळा गर्भपात झाला. तर दोन मुले दगावली. पण आई होण्याची त्यांची प्रखर इच्छा होती. त्यामुळे त्यांची आई सुशीलाबेन (वय ४८) यांनी आपले गर्भाशय देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार दि. १७ मे २०१७ रोजी प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर दीड वर्षांनी या गर्भाशयातून चिमुकलीचा जन्म झाला. जन्मावेळी राधाचे वजन १४५० ग्रॅम होते. पण ती आईचे दुध घेऊ शकत नव्हती. काही दिवस नाकातून नळीद्वारे दुध द्यावे लागत होते. तिला एकदा कावीळही झाली होती. श्वास घेण्यास त्रास होत होता. पण डॉक्टरांनी रात्रं-दिवस काळजी घेत राधा ठणठणीत बरे केले. आता तिचे वजन २६५० ग्रॅम झाले आहे. त्यानंतर रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, असे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी सांगितले. राधाला निरोप देताना डॉक्टरांची टीमही भावनाविवश झाली होती. मीनाक्षी यांनाही भावना अनावर झाल्या. यावेळी डॉ. सीमा पुणतांबेकर, डॉ. मिलिंद तेलंग, डॉ. पंकज कुलकर्णी आदी उपस्थित होते.
-----------------
‘राधा’च्या जन्मामुळे खुप आनंद झाला आहे. हे सगळे स्वप्नवत आहे. हे डॉक्टरच आमच्यासाठी देव आहेत. त्यामुळे माझ्या मुलीलाही त्यांच्यासारखे डॉक्टरच करणार आहे. रुग्णालयच आमचे दुसरे घर बनले होते. आता गुजरातमध्येही राधाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे खुप आनंद आहे.
..............................
- मीनाक्षी व हितेश वालंद असे झाले नामकरण
मीनाक्षी या कृष्णाच्या भक्त आहेत. त्यामुळे मुलगा झाला तर कन्हैया आणि मुलगी झाली तर राधा असे नाव ठेवायचे, असे ठरविले होते. तिला ‘झील’ (झरा) असे टोपण नावही देण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात मीनाक्षी या रुग्णालयातील ४०६ क्रमांकाच्या खोलीमध्ये होत्या, त्या खोलीचे नामकरणही आता ‘मीनाक्षी रुम’ असे करण्यात आले आहे.