डॉक्टर-पालिका वादात वाढतेय साथ
By admin | Published: September 13, 2016 01:45 AM2016-09-13T01:45:45+5:302016-09-13T01:45:45+5:30
शहरात ऐन गणेशोत्सवादरम्यान वाढलेली डेंगी आणि चिकुनगुनियाची साथ दिवसेंदिवस वाढत चालली असून, पालिकेकडे मात्र रुग्णांची योग्य ती नोंद नसल्याचे चित्र आहे.
पुणे : शहरात ऐन गणेशोत्सवादरम्यान वाढलेली डेंगी आणि चिकुनगुनियाची साथ दिवसेंदिवस वाढत चालली असून, पालिकेकडे मात्र रुग्णांची योग्य ती नोंद नसल्याचे चित्र आहे. महापालिका आणि डॉक्टर यांच्यातील वादाचा फटका रुग्णांना बसत असल्याचे दिसत आहे.
खासगी डॉक्टर, रुग्णालये आणि पॅथलॅबने पालिकेकडे आकडेवारी कळवावी, असे पालिकेकडून वारंवार सांगण्यात येत होते. याला खासगी यंत्रणा प्रतिसाद देत नसल्याचा आरोपही पालिकेकडून वारंवार करण्यात येतो. मात्र, पुण्यातील काही खासगी पॅथलॅबचालकांना याबाबत विचारल्यावर आपल्याकडे पालिकेची व्यक्ती आकडेवारी घेण्यासाठी येते असे सांगण्यात आले. मात्र तरीही पालिकेची आकडेवारी कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. मग या रुग्णांची नोंद नेमकी होते की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे.
याबरोबरच अनेक खासगी डॉक्टरही पालिकेकडे आपली आकडेवारी पाठवत आहेत. मात्र त्याची नोंद घेतली जात नसल्याची तक्रार काही डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केली आहे. डेंगीच्या रुग्णांची संपूर्ण माहिती कळविल्यास कदाचित साथ जाहीर करावी लागेल, म्हणून महापालिका खरी आकडेवारी जाहीर करीत नसल्याचा आरोपही काही डॉक्टरांकडून केला जात आहे.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सर्व क्षेत्रीय कार्यालयांतून सध्या असणाऱ्या साथीच्या आजारांच्या रुग्णांची माहिती मागविण्यात येत आहे. पालिका अनेक स्तरांवर याबाबत जनजागृतीही करत आहे. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जात असून, रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
- डॉ. एस. टी. परदेशी, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका
सध्या डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच ही साथ रोखण्यास पालिकेची यंत्रणा अपुरी असल्याचे दिसते. यामध्ये सध्या कोणत्याही आजाराचे निदान न झालेलेही अनेक रुग्ण आहेत. त्यामुळे ही संख्या आणखीही जास्त असण्याची शक्यता आहे. खासगी रुग्णालयांकडून ही आकडेवारी पालिकेला कळविली जात आहे. मात्र, जोपर्यंत रुग्ण दगावत नाहीत तोपर्यंत साथ आल्याचे जाहीर केले जात नाही. त्यामुळे डेंगीचा रुग्ण दगावण्याची पालिका वाट पाहते की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
- डॉ. अच्युत जोशी, जनरल फिजिशियन
मंगळवार पेठ, येरवड्यात सर्वाधिक रुग्ण
शहरात डेंगी व चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत असून, मंगळवार पेठ व येरवडा परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचे निष्पन्न झाले आहे. डेंगी व चिकुनगुनियाच्या चाचण्या करण्यासाठी खासगी रूग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर या चाचण्या ६०० रूपयांमध्ये करण्याचे त्यांच्यावर बंधन टाकण्यात यावे, अशी मागणी महापौर प्रशांत जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खाजगी रूग्णालयांमध्ये डेंगी व चिकुनगुनियाच्या चाचण्या करण्यासाठी दीड हजार ते चार हजार रूपये घेतले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर या चाचण्या ६०० रूपयांमध्ये करण्याची सक्ती रूग्णालयांना करण्यात यावी, अशी मागणी महापौरांनी राज्य शासनाकडे केली आहे. प्रशांत जगताप यांनी महापालिकेच्या दवाखान्यांना भेटी देऊन डेंगी व चिकुनगुनियाच्या रुग्णांची माहिती घेतली. या वेळी महापालिकचे आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी, डॉ. संजीव वावरे, डॉ. फ्रान्सिस उपस्थित होते.