अॅट्रोसिटीची भीती दाखवत डॉक्टरांकडून उकळली ७५ लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 04:46 PM2020-02-10T16:46:59+5:302020-02-10T16:47:46+5:30
मिटविण्यासाठी आला अन खंडणी घेऊन गेला
पुणे : डॉक्टरांच्या बिलावरुन झालेल्या वादातून महिलेने केलेल्या खोट्या तक्रारीत अॅट्रोसिटीची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपयांच्या खंडणीपैकी डॉक्टरांकडून तब्बल ७५ लाख रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्य म्हणजे हे विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर ती मिटविण्यासाठी आलेल्या डॉक्टर मित्राच्या भावानेच हे कृत्य केले़ ७५ लाख रुपये दिल्यानंतरही उरलेले ५५ लाख रुपये दिले नाही तर मुलाला अटक होईल, अशी धमकी दिल्याने शेवटी या डॉक्टरांनी पोलिसांकडे धाव घेतली.
विश्रामबाग पोलिसांनी मनोज अडसुळ (अत्र) (रा़ नवी पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पर्वतीमधील एका ६९ वर्षाच्या डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवार पेठेतील एका नर्सिग होममध्ये १८ ऑक्टोबर २०१९ रोजी घडला होता. याबाबतची माहिती अशी, फिर्यादी यांचा मुलगाही ही डॉक्टर आहे. त्याच्या मुलाने एका महिलेवर उपचार केले होते. त्या औषधोपचाराचे बिल अधिक असल्याचे महिलेचे म्हणणे होते. त्यावरुन वाद झाल्यावर या महिलेने विश्रामबाग पोलिसांकडे फक्त तक्रार अर्ज दिला होता. त्यावेळी हे डॉक्टर, त्यांचा मुलगा, डॉक्टर व त्यांचा भाऊ मनोज असे सर्व जण पोलिसांकडे गेले होते. ही खोटी तक्रार असल्याचे पोलिसांच्या चौकशीत लक्षात आल्यावर त्यांनी त्यात पुढे काही कारवाई केली नव्हती. त्याचा गैरफायदा मनोज अडसुळ याने घेतला़ त्यांनी डॉक्टरांना ही महिला दलित मुस्लिम समाजाची आहे़ तुमच्या मुलावर, बलात्कार, अॅट्रोसिटी असा गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच दलित समाजाच्या संघटना मुलाला अटक करा व कारवाई करण्यासाठी मागे लागले असल्याचे सांगत होता. या गुन्ह्यात ३ ते १० वर्षांची शिक्षा होऊ शकते, अशी भिती त्याने डॉक्टरांना दाखविण्यास सुरुवात केली. हे प्रकरण मिटविण्यासाठी १ कोटी ३० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले़ घाबरलेल्या डॉक्टरांनी पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार त्याने धनादेशाद्वारे ५४ लाख व रोख २१ लाख रुपये असे ७५ लाख रुपये एकाच दिवशी त्यांच्याकडून उकळले.
डॉक्टर घाबरलेले असल्याने त्यांच्याकडून आणखी पैसे उकळण्यासाठी तो उरलेले ५५ लाख रुपये द्यावेत, यासाठी डॉक्टरांकडे सातत्याने मागणी करत होता. तसेच उर्वरित रक्कम न दिल्यास मुलाला अटक होईल व कारवाई होईल अशी धमकी देत होता. शेवटी त्यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेतली़ खंडणी विरोधी पथकाने या महिती घेतल्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड अधिक तपास करीत आहेत.