डॉक्टर आई-बाबांवर प्रचंड ताण, पण त्यांच्याबद्दल वाटतो अभिमान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:09 AM2021-05-21T04:09:51+5:302021-05-21T04:09:51+5:30
पुणे : डॉक्टर आई-बाबांची धावपळ मुले गेल्या वर्षभरापासून पाहत आहेत. डॉक्टरांचे एरव्हीही कामाचे ताण जास्त असतात. मात्र, कोरोनाकाळात मानसिक ...
पुणे : डॉक्टर आई-बाबांची धावपळ मुले गेल्या वर्षभरापासून पाहत आहेत. डॉक्टरांचे एरव्हीही कामाचे ताण जास्त असतात. मात्र, कोरोनाकाळात मानसिक आणि शारीरिक ओढाताण प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे डॉक्टरांची मुले धास्तावलेली आहेत. काहींना आई-बाबांसारखे डॉक्टर व्हायचे आहे, तर काहींना वेगळी वाट चोखाळायची आहे. मात्र, आई-बाबांच्या कामाचा त्यांना अभिमानही वाटतो.
डॉक्टरांची मुले डॉक्टर होणार, इंजिनिअरची मुले इंजिनिअर असे सर्वसाधारण ठोकताळे पूर्वीपासून बांधले जातात. मात्र, आता काळ बदलला आहे. मुले लहानपणापासून आई-बाबांचे कामाचे स्वरूप जवळून पाहत असतात. त्यामुळे आपल्याला कोणत्या क्षेत्राकडे वळायचे आहे, याबद्दल त्यांचे ठाम मत तयार होत असते. कोरोनाच्या संकटात डॉक्टर फ्रंटलाइनवर लढत आहेत. त्याचा परिणाम साहजिकच त्यांच्या कौटुंबिक जीवनावर होत असतो. घरी पुरेसा वेळ देता येत नसल्याने मुलेही निराश झाली आहेत. मात्र, आई-बाबा एक प्रकारे समाजहितासाठी काम करत असल्याने त्यांच्या कामाचा मुलांना अभिमानही वाटतो आहे.
----------------
गेल्या वर्षभरापासून आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढते आहे. डॉक्टर नर्स, सर्वच आरोग्य कर्मचारी रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत. माझे बाबा डॉ. मिलिंद खेडकर पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आई डॉ. सुनीता ससून रुग्णालयात भूलतज्ज्ञ आहे. त्या दोघांच्या कामाचे स्वरूप मी लहानपणापासूनच पहात आलो आहे. मात्र, कोरोनाच्या काळात कामाचा व्याप, शारीरिक आणि मानसिक ताण किती तरी पटींनी वाढला आहे. मात्र, रुग्णसेवा ही एक प्रकारे देशसेवा करण्याची संधी आहे. त्यामुळे मलाही आई-बाबांप्रमाणे डॉक्टर होण्याची इच्छा आहे.
- अथर्व खेडकर
-----
आमचे बाबा बीजे मेडिकल कॉलेजमध्ये सहायक डॉक्टर असून आई तळेगाव मेडिकल कॉलेजमध्ये सहायक डॉक्टर आहे. वर्षभरापासून त्या दोघांवर कामाचा खूप ताण आहे. दोघेही घरात फारसा वेळ देऊ शकत नाहीत. आम्हाला मोठेपणी डॉक्टर व्हायचे नाही तर यूट्युबर व्हायचे आहे. सध्या शाळा नसल्याने घरात नुसते बसून खूप कंटाळा येतो. त्यामुळे आम्ही यूट्युबवर वेगवेगळे प्रयोग पाहत असतो. त्यामुळे त्यातच करिअर करायचे आहे.
- हिमांशू क्षीरसागर आणि शुभम क्षीरसागर
----
माझी आई डॉक्टर सुचित्रा खेडकर औंध रुग्णालयात कार्यरत आहे, तर बाबा इंजिनियर आहेत. आमचा दोघांचा ओढा डॉक्टरी पेशाकडे नसून आम्हाला इंजिनिअरिंग जास्त आवडते. आईची ड्युटीची वेळ जास्त असल्यामुळे तिला घरी कमी वेळ देता येतो. रात्रपाळी, कामाचा ताण, कोरोनाची जोखीम हे सगळे आम्ही गेल्या वर्षभरापासून पाहात आहोत. त्यामुळे डॉक्टर होण्याचा विचार अजून तरी नाही. मात्र, आईच्या कामाचा अभिमान नक्कीच वाटतो.
- आदित्य आणि कृष्ण खेडकर