उपचारासाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणीवर डॉक्टरचा बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 10:46 AM2022-07-07T10:46:58+5:302022-07-07T10:47:21+5:30
सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका 19 वर्षीय तरुणीवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या डॉक्टरने तरुणीचे मोबाईलमध्ये नग्न अवस्थेतील फोटो काढले आणि याविषयी कुणाला काही सांगितल्यास सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
डॉ. योगेश लक्ष्मण वाल्हे (वय 45, अमोल एनक्लेव्ह, कोटकर लेन भाऊ पाटील रोड, औंध) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. हा सर्व प्रकार नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत घडला.
ह्या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कोथरूड परिसरातील पौड रस्त्यावर डॉ. योगेश वाल्हे यांचे क्लिनिक आहे. तरुणी मणक्याच्या आजाराचे उपचार करण्यासाठी त्या ठिकाणी आली होती. यावेळी ही तरुणी अल्पवयीन असल्याची माहित असतानाही संबंधित डॉक्टरने तिच्या वयाचा गैरफायदा घेतला आणि उपचार करण्याच्या पाहण्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत वारंवार हा प्रकार घडला. संबंधित डॉक्टर आरोपीने फिर्यादीचे नग्न अवस्थेतील फोटो मोबाईल मध्ये काढले आणि याविषयी कोणाला काही सांगितल्यास हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.