काय सांगता! झोपेत असताना पोटात गेली चार इंचाची सुई...!; पुण्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 11:00 AM2021-12-17T11:00:29+5:302021-12-17T11:04:20+5:30
शिक्रापूर (ता. शिरूर): येथील २३ वर्षीय युवती दुपारच्या सुमारास घरात चटईवर झोपली होती. यावेळी चटईवर पडली असल्याने सुई अचानकपणे ...
शिक्रापूर (ता. शिरूर): येथील २३ वर्षीय युवती दुपारच्या सुमारास घरात चटईवर झोपली होती. यावेळी चटईवर पडली असल्याने सुई अचानकपणे तिच्या पोटात टोचल्या गेल्याने आत पूर्ण गेली. अचानक सुई टोचल्याने युवतीला त्रास झाला. रक्त आल्याने तसेच पोटात सुई गेल्याचे समजल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला तातडीने शिक्रापूर येथील हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांना सुई बाहेर काढण्यात अपयश येत होते.
यानंतर डॉक्टरांनी माऊलीनाथ रुग्णालयाचे संचालक डॉ. पवन सोनवणे यांच्याशी संपर्क केला. डॉ. सोनवणे यांनी तेथील हॉस्पिटलमध्ये जात युवतीला माऊली नाथ रुग्णालयात नेले. तिच्या पोटाचा एक्स-रे काढून तपासणी केली असता पोटातील पुढील बाजूमध्ये अंदाजे चार इंच लांबीची सुई अडकली असल्याचे आढळले. डॉ. पवन सोनवणे, डॉ. अजिंक्य तापकीर, डॉ. प्रदीप काळे, डॉ. अभिजित गोटखिंडे यांनी त्या युवतीच्या पोटावर शस्त्रक्रिया करत पोटामध्ये असलेली चार इंच सुई बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. तब्बल अर्ध्या तासांच्या यशस्वी प्रयत्नानंतर डॉक्टरांच्या पथकाला युवतीच्या पोटात गेलेली सुई बाहेर काढण्यात यश आले.