गलथान प्रशासनामुळे डॉक्टरांना फटका
By admin | Published: July 19, 2015 03:50 AM2015-07-19T03:50:26+5:302015-07-19T03:50:26+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकाने धक्काबुक्की केल्याच्या घटनेचा वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून निषेध नोंदविण्यात आला.
- मंगेश पांडे, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकाने धक्काबुक्की केल्याच्या घटनेचा वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून निषेध नोंदविण्यात आला. मात्र, महापालिका प्रशासन आणि वैद्यकीय विभागाच्याच गलथान कारभारामुळे अशा घटनांना डॉक्टरांना सामोरे जावे लागत आहे.
या रुग्णालयात शहरासह हद्दीबाहेरीलही रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. मावळ, मुळशी, हवेली, खेड, आंबेगाव या तालुक्यांतील गावांमधील रुग्णांचा अधिक समावेश आहे. ओपीडीमध्ये दर दिवशी सुमारे बाराशे रुग्णांची तपासणी केली जाते. त्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यातच काही डॉक्टर निवृत्त झाले आहेत. त्यामुळे कामकाजावर अधिकच ताण येत आहे. ओपीडीची वेळ १० ते १ असताना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तीन वाजेपर्यंत तपासणी सुरूच असते. कुठलाही रुग्ण आला, तरी त्यावर उपचार करण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे दर दिवशी रुग्णांची संख्या वाढतच आहे.
शस्त्रक्रिया करण्यास उशीर केल्याच्या कारणावरून रुग्णाच्या नातेवाइकाने वायसीएममधील न्यूरोसर्जनला धक्काबुक्की केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. ही घटना घडण्यास अपुरे मनुष्यबळच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. धक्काबुक्की झालेले डॉक्टर न्यूरोसर्जन आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या असताना येथे केवळ एकच न्यूरोसर्जन आहेत. या आजाराचे अधिक रुग्ण असल्यास एका व्यक्तीला हा भार पेलणे शक्य होत नाही. या ताणातून डॉक्टर व रुग्णाचे नातेवाईक यांच्यात वाद होण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी वायसीएममधील डॉक्टरांची संख्या वाढविण्याची मागणी होत असताना, महापालिका प्रशासन आणि वैद्यकीय विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
रुग्णाला तातडीने व चांगले उपचार मिळावेत, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. उपचार मिळण्यास उशीर झाल्यास अथवा रुग्णाकडे दुर्लक्ष झाल्यास नातेवाइकांनी संताप व्यक्त करणे स्वाभाविक आहे. परंतु, डॉक्टरांना धक्काबुक्की करणे हेदेखील योग्य नाही.
रुग्णाला काही अडचण असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घालून अडचण सोडविण्यासाठी वेळीच पावले उचलायला हवीत. काही गंभीर प्रकार घडल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर असते. मात्र, सध्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडून अडचणी सोडविणे तर दूरच. ते वेळेत फोनही उचलत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. याच पदावर यापूर्वी काम केलेल्या अधिकाऱ्यांचे अशा परिस्थितीवर लक्ष असायचे. रुग्णांशी संवाद, तसेच नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेतले जायचे. मात्र, ही बाब सध्याच्या अधिकाऱ्यांकडून होत नसल्याचे दिसून येते. (प्र्रतिनिधी)
ओळखीवर मिळते चांगली सुविधा
कामाचा प्रचंड ताण असल्याने कधीकधी येथील डॉक्टर रुग्णाकडे हवे तितके लक्ष देत नाहीत. मात्र, लोकप्रतिनिधींशी संबंधित असलेल्या अथवा ओळखीच्या रुग्णांची बडदास्त राखली जाते. येथे वशिलेबाजीवर बरेच काही अवलंबून आहे. त्यामुळे अनेकदा सामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
डॉक्टर व नातेवाइकांमध्ये सुसंवाद हवा
रुग्णाच्या नातेवाइकांना डॉक्टरांकडून उपचाराची व्यवस्थित माहिती आणि मार्गदर्शन हवे असते. मात्र, अनेकदा डॉक्टर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. नातेवाइकांशी व्यवस्थित चर्चा करीत नाहीत. यामुळे नातेवाईकदेखील संतापतात. डॉक्टरांनी नातेवाइकांशी सुसंवाद ठेवल्यास अनुचित प्रकार घडण्यास आळा बसेल.
घटनेचा निषेध
शस्त्रक्रिया करण्यास उशीर होत असल्याच्या कारणावरून वायसीएम रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. अमित वाघ यांना भीमा थोरात या नातेवाइकाने धक्काबुक्की केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. या घटनेचा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी निषेध नोंदविला.तसेच, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फेही या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. तसेच विविध संघटनांनीही निषेध केला आहे.
दर दिवशी ओपीडीचे बाराशे ते पंधराशे रुग्ण असतात. त्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. बरेचसे डॉक्टर निवृत्त झाले आहेत. यामुळे कामकाजावर ताण येतो. अशातच रुग्णाच्या नातेवाइकांची समजून घेण्याची मानसिकता नसते. यातून अशा घटना घडत आहेत.
- मनोज देशमुख,
वैद्यकीय अधीक्षक, वायसीएम