डाॅक्टरसाहेब, किडनी घ्या, पण दीड लाख रुपये द्या; शेतमजुराची अशीही विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:02 PM2022-11-28T12:02:35+5:302022-11-28T12:04:21+5:30

कर्ज फेडण्यासाठी शेतमजुराची विनवणी

Doctor, take a kidney, but pay one and a half lakh rupees! | डाॅक्टरसाहेब, किडनी घ्या, पण दीड लाख रुपये द्या; शेतमजुराची अशीही विनवणी

डाॅक्टरसाहेब, किडनी घ्या, पण दीड लाख रुपये द्या; शेतमजुराची अशीही विनवणी

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क  
पुणे : ‘डाॅक्टरसाहेब, माझ्या दाेन मुलींच्या लग्नासाठी काही वर्षांपूर्वी तीन ते चारजणांकडून कर्ज काढले हाेते. त्याबदल्यात एकाच्या शेतावर काम करताेय. त्यातील काही पैसे परत केले. आता काम हाेत नाही अन् मला त्यांचे व्याजाचे मिळून दीड लाख रुपये द्यायचेत. कृपया माझी किडनी घ्या; पण मला दीड लाख रुपये द्या,’ अशी विनवणी एका शेतमजुराने डाॅक्टरांकडे केली. सातारा येथून ससून रुग्णालयात आलेल्या या शेतमजुराने केलेल्या विनंतीनंतर डाॅक्टरही गाेंधळून गेले. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गव्हाणवाडी येथील भिका अडागळे (५६) हे रविवारी भल्या सकाळीच ससूनमधील अपघात विभागात आले हाेते. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या डाॅक्टरांना वाटले की, काही तपासणी करायची असेल. परंतु, तपासणीऐवजी त्यांनी डाॅक्टरांना ‘किडनी घ्या, पण दीड लाख रुपये द्या,’ अशी भलतीच मागणी केली. त्यामुळे डाॅक्टरही बुचकळ्यात पडले. 

डाॅक्टरांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. कायद्याने असे करता येत नाही, असे सांगितले. परंतु, अडागळे ऐकण्याच्या तयारीत नव्हते. शेवटी ससूनमधील वैद्यकीय समाजसेवा अधीक्षकांकडून त्यांचे समुपदेशन करण्याचे ठरले. अडागळे यांना दाेन मुली असून, त्यांची लग्ने झाली आहेत. स्वत:ची शेतजमीनही नाही. दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करून ते पाेट भरतात. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी त्यांनी दाेन्ही मुलींची लग्ने करण्यासाठी तीन ते चार सावकारांकडून लाख-दीड लाख रुपये व्याजाने घेतले हाेते. यापैकीच एका सावकाराच्या शेतावरच ते गेली २५ वर्षे महिन्याकाठी अवघ्या ७०० रुपयांवर काम करत आहेत, अशी माहिती अडागळे यांनी दिली.

आता काम हाेत नाही अन् सावकारांचा त्रासही सहन हाेत नाही. त्यामुळे किडनी देण्यास मी तयार आहे. यानंतर मी जगलाे काय अन् मेलाे काय, काही फरक पडत नाही. 
- भिका अडागळे, गव्हाणवाडी, पाटण, सातारा

अशी परिस्थिती निर्माण करायची की किमान वेतन न देता त्याची इच्छा असली तरी ताे कामावरून साेडून जाऊ शकत नाही, या प्रकारालाही वेठबिगारी म्हणतात. हे सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. अशा प्रकरणात जिल्हाधिकारी वेठबिगारी कायद्याखाली मजुराची सुटका करून त्याला भरपाई मिळवून 
देऊ शकतात.
- नितीन पवार, कामगार नेते

 

Web Title: Doctor, take a kidney, but pay one and a half lakh rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.