डॉक्टरांचा आज संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 03:29 AM2018-01-02T03:29:54+5:302018-01-02T03:30:07+5:30
केंद्र शासनाच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकासंदर्भातील चूकीच्या धोरणाविरोधात देशभरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांकडून येत्या २ जानेवारी रोजी ‘काळा दिवस’ पाळणार जाणार आहे.
पुणे : केंद्र शासनाच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकासंदर्भातील चूकीच्या धोरणाविरोधात देशभरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांकडून येत्या २ जानेवारी रोजी ‘काळा दिवस’ पाळणार जाणार आहे.
पुण्यातील डॉक्टरही या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे मंगळवारी रुग्णालयामधील केवळ आपात्कालीन सेवा सुरु राहणार आहेत. सर्व डॉक्टरांनी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत १२ तास संप पुकारला आहे. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या मुद्यावरून नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच डॉक्टर विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष पेटणार आहे.
केंद्र शासनाच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा मसुदा देशभरातील डॉक्टरांना मान्य नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेने २ जानेवारीला देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय.
नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा मसुदा गरीब रुग्ण व लोकशाहीच्याही विरोधात आहे. तसेच वर्षभरापासून केंद्र शासनाशी नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, शासनाकडून अद्यापही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. या नवीन विधेयकामुळे भ्रष्टाचार वाढेल.तसेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांवर कोणाचाही वचक राहणार नाही. त्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
या विधेयकाच्या माध्यमातून केंद्र शासन वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदांवर राजकीय किंवा अवैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना घेवून येण्याचा प्रयत्नात आहेत.त्यास विरोध असल्याचे आयएमएने पुणे विभागीय अध्यक्ष डॉ.प्रकाश मराठे यांनी कळविले आहे.