मांत्रिकास बोलावून रुग्णावर मंत्रोपचार केल्याप्रकरणी डॉक्टरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 09:46 PM2018-03-29T21:46:15+5:302018-03-29T21:54:11+5:30
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान संध्या गणेश सोनवणे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पुणे : मांत्रिकास बोलावून रुग्णावर मंत्रोपचार करणा-या डॉक्टराला अलंकार पोलिसांनी अटक केली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेला हा प्रकार १३ मार्च रोजी उघड झाला होता. डॉ. सतीश शाहुराव चव्हाण (वय ४५, रा. शुक्रवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असून न्यायालयाने त्याची २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा आदेश दिला.
उतारा करणारा मांत्रिक सचिन सदाशिव येरवडेकर (वय ४८, रा. ३०६, कसबा पेठ) याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. हा सर्व प्रकार २० फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडला होता. संध्या गणेश सोनवणे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप (वय २२, रा. भोसरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे यांच्या छातीमधील दुधाच्या गाठी काढण्याचे आॅपरेशन डॉ. सतीश चव्हाण याच्या चव्हाण नर्सिंग होममध्ये करण्यात आले होते. मात्र आॅपरेशन करताना मोठा रक्तस्राव झाला होता. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान सोनवणे मंगेशकर रुग्णालयात असताना सकाळी ७ ते ८.३० ही वेळ यमाची घंटा आहे, असे सांगून त्यांच्या कुटुंबियांना आॅपरेशन करण्यापासून परावृत्त केले. बरे होण्यासाठी सोनवणे यांना मंत्र पठण करण्यास सांगितले. मांत्रिकास बोलावून त्यांच्या उतारा केल्याचे फियार्दीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी डॉ. चव्हाण आणि मांत्रिक येरवडेकर यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबतच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीनानाथ येथे केलेल्या उपचाराची कागदपत्रे प्राप्त झालेली असून, चव्हाण याने रुग्णावर केलेल्या उपचाराची कागदपत्रे जप्त करण्यासाठी, सोनवणे यांचा मृत्यू निष्काळजीपणामुळे झाला आहे का, त्यांच्या मृत्यूस कोण जबाबदार आहेत, उपचाराच्या वेळी डॉक्टरसोबत कोण नर्स अथवा कर्मचारी होते. याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संध्या काळे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने डॉ. चव्हाण याला पोलीस कोठडी सुनावली.