तरंगत्या दवाखान्याला मिळेना डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:58 AM2018-10-27T01:58:21+5:302018-10-27T01:58:52+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने बोटीतील तरंगत्या दवाखान्यासाठी डॉक्टर नसल्याने दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा मिळत नसून या दवाखान्याची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
भोर : भाटघर धरणाच्या पाण्यामुळे संपर्क तुटलेल्या व अतिशय दुर्गम डोंगरी गावांतील लोकांना आरोग्यसेवा मिळावी, म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने बोटीतील तरंगत्या दवाखान्यासाठी डॉक्टर नसल्याने दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा मिळत नसून या दवाखान्याची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
भाटघर धरणातील पाण्याच्या फुगवट्यामुळे दळणवळणाचा संपर्क तुटलेल्या भोरपासून सुमारे ५० ते ६० किलोमीटरवर धरणाच्या काठावर असलेल्या दुर्गम डोंगरी १५ ते २० गावांना या बोटीद्वारे बाह्य रुग्णसेवा नारळी पौर्णिमेला आॅगस्ट महिन्यात सुरू होत होती. ही सेवा धरणात पाणी असेपर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंत असे सात महिने पुरवली जाते. या सेवेसाठी १७ वर्षांपूर्वी इंडोजर्मन प्रकल्पातून २० लाख रुपयेकिमतीची बोट दिली आहे. बोटीत या तरंगत्या दवाखान्यासाठी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका, दोन शिपाई, कंपौंडर यांचे पथक आरोग्यसेवा पुरवते. बाधित गावात दवाखाना नसल्याने एखाद्या गावात अपघात, सर्पदंश झाल्यास, तसेच बाळंतपणासाठी महिला आल्यास त्यांना या तरंगत्या दवाखान्याच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी रुग्ण ही बोट ठेवण्यात आली आहे. आठवड्यातून पाच दिवस वैद्यकीय सेवा देणे अपेक्षित आहे. मात्र निधीची कमरता व डॉक्टराआभावी तसेच इंधनाचा खर्च यामुळे ही सेवा आठवड्यातील दोन दिवसच सेवा पुरवली जाते.
भाटघर धरण भागातील मळ््याची सुतारवाडी, नानावळे, सांगवी वे. खो, बोपे, कुंबळे, भुतोंडे, डेरे, भांड्रावली, खुलशी, गृहिणी, चांदवणे या गावात आठवड्यातील दर बुधवारी व शुक्रवारी आरोग्यसेवा पुरवली जाते. मात्र मागील अनेक दिवसांपासून डॉक्टर उपलब्ध नसल्याने परिचारिकेतर्फे तात्पुरत्या उपाययोजना करून रुग्णांना परत पाठवले जात आहे. एखादा अपघात मोठा आजार किंवा प्रसूतीची सुविधा नसल्याने नागरिकांना ६० किलोमीटर भोरला यावे लागते. त्यामुळे शासनाने लाखो रुपये खर्च करून सुरू केलेल्या तरंगत्या दवाखान्याचा या दुर्गम भागातील ग्रामस्थांना कसलाच फायदा होत नाही. यामुळे या दवाखान्यासाठी एक तर डॉक्टर उपलब्ध करावा; अन्यथा दवाखाना बंद करावा, अशी मागणी जोगवडी प्राथमिक आरोग्य रुग्ण कल्याण समितीचे सदस्य मारुती रहाटवडे यांनी केली आहे.
> दुर्गम डोंगरी भागातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा नसल्याने लोकांच्या आरोग्यासाठी असलेल्या भाटघर धरणातील तरंगत्या दवाखान्यात नागरिकांच्या औषध उपचारासाठी त्वरित वैद्यकीय अधिका-यांची नेमणूक केली जाईल.
- प्रवीण माने,
सभापती बांधकाम व आरोग्य समिती जि. प. पुणे