तक्रार देण्यास आलेल्या डॉक्टरला पोलिसाकडूनच मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:40+5:302021-06-02T04:09:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फोन उचलला नाही म्हणून महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरांना मारहाण केली. त्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फोन उचलला नाही म्हणून महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरांना मारहाण केली. त्याची तक्रार देण्यासाठी बाणेर पोलीस चौकीत आलेल्या दोघा डॉक्टर व सुरक्षा रक्षकाला शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेत काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या भावाच्या मदतीने पोलीस चौकीत मारहाण केली.
याप्रकरणी पोलीस नाईक सचिन सिद्धेश्वर गायकवाड (वय ४०) आणि सागर सिद्धेश्वर गायकवाड (वय ३५, दोघे रा. डी. पी. रोड, औंध) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर गायकवाडला अटक झाली असून सचिन गायकवाड पळून गेला आहे. बाणेर येथील महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमधील डॉ. अजयश्री मस्कर यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे प्रवीण जाधव यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सागर गायकवाड याने फिर्यादींना फोन केला होता. पण कामात असल्याने त्यांनी तो घेतला नाही. सागर याने त्यांच्या व्हाॅट्सॲपवर मेसेज पाठवून त्यांना शिवीगाळ केली होती. हा प्रकार फिर्यादी यांनी पोलिसांना कळविला होता. दरम्यान, सोमवारी दुपारी दीड वाजता सागर हा जाधव यांचा भाचा असल्याचे सांगून कोविड सेंटरमध्ये आला. तेथे त्याने फिर्यादी व तेथील एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. यावेळी दोन मार्शल तेथे आले. त्यांनी दोघांना समजावून पोलीस चौकीत जाऊन तक्रार देण्यास सांगितले.
त्यानुसार फिर्यादी व त्यांच्या सहकारी डॉक्टर व सुरक्षा कर्मचारी हे बाणेर येथील पोलीस चौकीत गेले. तेथे सागर गायकवाड याने पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड व इतर पोलीस मित्रांना बोलावून घेतले. त्या सर्वांना दोघा डॉक्टर व सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण केली. चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक तेथे आल्यानंतर डॉक्टरांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.
चौकट
...अन्यथा काम बंद करू
डॉ. अजयश्री मस्कर यांनी सांगितले की, येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी परवानगी नाही. उपचार करणारे डॉक्टर रुग्णांच्या एका नातेवाईकांच्या संपर्कात असतात. ते त्यांना दैनंदिन माहिती देत असतात. मिटिंगमध्ये असल्यामुळे फोन घेता आला नाही. सागर गायकवाड याने व्हॉट्सॲपवर शिवीगाळ केली होती. याची माहिती पोलिसांना दिली होती. आम्ही तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेल्यावर तेथे पोलिसांना बोलावून त्याने मारहाण केली. गेली ८ ते ९ महिने आम्ही अहोरात्र काम करत आहोत. राज्यात बाणेरच्या कोविड सेंटरचा मृत्यूदर सर्वांत कमी आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केली नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करू.
चौकट
“हा प्रकार घडल्यानंतर सागर गायकवाडला तातडीने अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड याचा शोध घेत आहोत.”
-राजकुमार वाघचवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:श्रृंगी पोलीस ठाणे.