डॅश बोर्डवरून सर्वपक्षीय नेत्यांसह डॉक्टर संघटनाही आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:18 AM2021-05-05T04:18:08+5:302021-05-05T04:18:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: शहरातील रुग्णालयांमधील रिकाम्या खाटांची माहिती देणारा डॅश बोर्ड अद्ययावत करत नसल्यावरून महापालिकेच्या विरोधात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: शहरातील रुग्णालयांमधील रिकाम्या खाटांची माहिती देणारा डॅश बोर्ड अद्ययावत करत नसल्यावरून महापालिकेच्या विरोधात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. यात डॉक्टर संघटनांचाही समावेश आहे. खासगी रुग्णालये सहकार्य करत नसल्याची तक्रार विभागीय आयुक्तांनीच शिष्टमंडळाकडे केली. त्यावर अशा रुग्णालयांवर कारवाई करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
मंगळवारी दुपारी या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. राजीव गांधी स्मारक समितीच्या माध्यमातून राव यांना निवेदन देण्यात आले. महापालिकेचा हा डॅश बोर्ड अद्ययावत नसल्याने पुण्यात अत्यवस्थ रुग्णाला बरोबर घेऊन रिकामा बेड शोधत नातेवाईकांना हॉस्पिटल टू हॉस्पिटल दिवसा व रात्रीही वणवण फिरावे लागते. एक डॅश बोर्ड अद्ययावत करू न शकणाऱ्या महापालिका प्रशासनाची लाज वाटते अशा तीव्र शब्दांत शिष्टमंडळाने आपल्या भावना राव यांच्याकडे व्यक्त केल्या.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, आपचे डॉ. अभिजित मोरे, मुकुंद किर्दत, शिवसनेचे प्रशांत बधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर प्रशांत जगताप, प्रदेश पदाधिकारी रवींद्र माळवदकर, स्थायी समितीचे माजी सभापती शाम देशपांडे, मेडिकल कौन्सिलचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, पुणे शाखाध्यक्ष डॉ. बी. एस. देशमुख, डॉ. जयश्री तोडकर या वेळी उपस्थित होते.
राव यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले. खासगी रुग्णालये रिकाम्या बेडची माहिती कळवत नाहीत. रुग्ण दाखल केल्यावर, डिस्चार्ज दिल्यावर तपशील देत नाहीत असे राव यांनी सांगितले. वारंवार कळवल्यानंतरही त्याचे असहकार्य असते असे ते म्हणाले.
शिष्टमंडळाने यावर अशा रुग्णालयांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करून कारवाई करावी अशी मागणी केली. डॅश बोर्ड अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांना त्यावर गेले की लगेचच कोणत्या रुग्णालयात जागा आहे हे लक्षात येऊन थेट तिथेच जाता येईल. रुग्णांचे प्रवेशही केंद्रीय पद्धतीने व्हावेत अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
यात वैयक्तिक लक्ष घालू, महापालिका प्रशासनाबरोबर चर्चा करू, माहिती घेऊ व निश्चितपणे मार्ग काढू असे आश्वासन राव यांनी शिष्टमंडळाला दिले.