मान टाकलेल्या कुपोषित घारीला डॅाक्टरांमुळे मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:14 AM2021-02-17T04:14:47+5:302021-02-17T04:14:47+5:30
पुणे : कुपोषण झाल्याने एक घार रस्त्यावर पडली होती. तिला हलताही येत नव्हते. परंतु, ती जिवंत होती. पक्षीप्रेमी आणि ...
पुणे : कुपोषण झाल्याने एक घार रस्त्यावर पडली होती. तिला हलताही येत नव्हते. परंतु, ती जिवंत होती. पक्षीप्रेमी आणि डॉक्टर असलेल्या आशिष मेरूरकर यांना त्या घारीबद्दल समजले आणि त्यांनी तिला उपचारासाठी घरी आणले. तिच्यावर उपचार केले. त्यानंतर कात्रज येथील प्राणी अनाथालयात सोडले. आता ती घार निरोगी झाली आहे.
या विषयी डॅा. मेरूरकर म्हणाले, ‘‘एक घार जमिनीवर पडल्याचा निरोप आला आणि नंतर घारीला घरी आणले. पहिल्या दिवशी तिने काहीच खाल्ले नाही, थोडे पाणी पिले. दुसऱ्या दिवशी पाणी पाजताना तिने तेलकट स्वरूपाच्या उलट्या काढल्या, बहुधा तळलेले आणि खराब मांस (चायनीज गाड्यांवरचे) खाल्ले असावे आणि प्यायला पाणीही न मिळाल्याने अन्न विषबाधा आणि उष्माघात यामुळे ती आदल्या दिवशी ग्लानी येऊन पडली असावी. पण उलट्या केल्यावर थोड्या वेळाने थोडे चिकन खाल्ले. पहिले तीन-चार दिवस कायम मान टाकून झोपायची. मग हळूहळू मान धरणे, चालत फिरणे, पंख फडफडवणे सुरू झाले. पण उडणे जमत नव्हते. शेवटी १५ फेब्रुवारीला तिला कात्रज सर्प उद्यानाच्या प्राणी अनाथालयात दाखल केले. तिथे तिचे वजन ५०० ग्रॅमपेक्षाही कमी भरले. तेथील अधिकाऱ्यांनी तिला कुपोषण झाले आहे, असे सांगितले. पण त्याच वेळी तिची तब्येत व्यवस्थित असल्याचे बोलले. बहुधा अशक्तपणामुळे तिला उडता येत नव्हते. मात्र तिचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश आले. या कामी अमोल, पार्थ, जोया, सुरभी, सूफीयान, गोविंद यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
————————————————
उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी ठेवा
शहरी भागात पक्ष्यांना अन्न मिळू शकते, पण पाणी सहजी मिळत नाही. त्यातच आता उन्हाळा येतोय तेेव्हा पाण्याने भरलेले किमान एखादे भांडे टेरेस किंवा गॅलरीमध्ये सावलीच्या जागी जरूर ठेवा, असे आवाहन गिरीमानस संस्थेचे डॉ. आशिष सुरेश मेरूकर यांनी केले आहे.
------------