प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 07:42 PM2018-06-14T19:42:11+5:302018-06-14T19:42:11+5:30
विद्यावेतनात ११ हजारांपर्यंत वाढ करावी या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे.
पुणे : विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी ससून सर्वोपचार रूग्णालयातील प्रशिक्षणार्थी (इंटर्न) डॉक्टरांनी पुकारलेला संप अद्याप सुरुच आहे. या संपामुळे रूग्णसेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली. मात्र, या संपाचा परिणाम रुग्णसेवेवर झाला नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला.
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना दरमहा मिळणाऱ्या सहा हजार रुपये विद्यावेतनात ११ हजारांपर्यंत वाढ करावी या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. तातडीच्या सेवा वगळता इतर सर्व विभागातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे बाह्यरुग्ण विभाग, वार्ड, कॅथलॅब, रक्तपेढी, श्वानदंश विभागातील सेवा विस्कळीत झाली होती. प्रामुख्याने रुग्णांचे रक्ताचे नमुने घेणे, रुग्णाचा इतिहास घेणे, डॉक्टरांना सहाय्य करण्याची भूमिका प्रशिक्षणार्थी डॉक्टर पार पाडतात. त्यांच्या अनुपस्थितीत ही कामे निवासी डॉक्टरांना करावी लागत आहेत.
वैद्यकीय शिक्षण विभागाने ११ हजार वेतन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यासंदर्भात पाठपुरवठा करूनही ते वाढविण्यात आले नाही. दोन मे २०१८ रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्सच्या प्रतिनिधींना येत्या १५ दिवसात या विषयावर निकाल लावण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यावर गेल्या महिना-दीड महिन्यांत निर्णय झालेला नाही. त्यामुळे संपूर्णं महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत.
या बाबत माहिती देताना ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, बुधवारी (दि. १३) २२८ पैकी २२० प्रशिक्षणार्थी डॉक्टर गैरहजर होते. गुरुवारी (दि. १४) गैरहजर असणाऱ्या प्रशिक्षणार्थींचे प्रमाण २१७ इतके होते. या संपामुळे रुग्णांच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.