दुर्मिळ कॅन्सर ट्युमर काढण्यात डॉक्टरांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:51+5:302021-06-29T04:08:51+5:30
पुणे : ५० वर्षीय महिलेच्या उजव्या बाजूच्या स्तनामध्ये २० बाय १५ बाय १२ सेंमी एवढ्या आकाराचा ट्युमर असल्याचे निदान ...
पुणे : ५० वर्षीय महिलेच्या उजव्या बाजूच्या स्तनामध्ये २० बाय १५ बाय १२ सेंमी एवढ्या आकाराचा ट्युमर असल्याचे निदान झाले. तिसऱ्या टप्प्यातील कॅन्सरचे निदान झाल्याने डॉक्टरांनी शत्रक्रियेचा निर्णय घेतला. वरिष्ठ कर्करोग शल्यविशारद डॉ. अनुपमा माने यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने महिलेच्या स्तनातून तीन किलो वजनाचा ट्युमर काढण्यात यश मिळविले. कर्करोगामुळे त्वचेसंदर्भात निर्माण झालेला दोष काढून पुन्हा सामान्य स्थितीत आणण्यासाठी मस्क्युलोक्युटॅनियस फ्लॅप या तंत्राने प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.
गेले वर्षभर ट्युमर वाढत गेला. वेदना तीव्र झाल्यावर त्या खासगी रुग्णालयात दाखल झाल्या. सोनोग्राफी आणि बायोप्सी केल्यावर मोठे फायलॉईडस असल्याचे निदान झाले व पेटस्कॅन केल्यावर तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचे निदान झाले. हा संयोेजित उतींचा कर्करोग असल्याने नेहमी निदान होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगांपेक्षा वेगळा होता. वरिष्ठ कर्करोग शल्यविशारद डॉ. अनुपमा माने यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने महिलेच्या स्तनातून तीन किलो वजनाचा ट्युमर काढला.
डॉ. अनुपमा माने म्हणाल्या की, ‘ट्युमर इतका मोठा होता की तो कधीही फुटून बाहेर येण्याची शक्यता होती व मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होण्याचा धोका होता. ट्युमरवरील त्वचादेखील खूप पातळ झाली होती. पहिल्यांदा शस्त्रक्रियेने हा ट्युमर काढणे महत्त्वाचे होते आणि त्यानंतर त्वचेच्या दोषावर उपचार करणे गरजेचे होते. संभाव्य कर्करोगग्रस्त रुग्ण उशिरा निदानासाठी येतात, तेव्हा गुंतागुंत वाढण्याची जोखीम असते. पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात निदान व उपचार केल्यास चांगले परिणामही दिसून येतात.
जागरुकतेची गरज
‘कर्करोगाच्या लक्षणांबाबत व डॉक्टरांकडे कधी जावे, याबाबत अधिक जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. स्तनाच्या बाबतीत महिलांनी कुठलीही गाठ किंवा बदल आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.’ डॉक्टरांच्या टीमध्ये डॉ. अनुपमा माने व डॉ. अमित मुळे यांच्यासह डॉ. नीता डिसूझा यांचाही समावेश होता.