चारित्र्यावर संशय घेत हातोडीने डोक्यात वार करत डॉक्टर पत्नीचा निर्घृण खून; पिंपरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 05:50 PM2021-09-06T17:50:33+5:302021-09-06T17:51:40+5:30
तलाठी असलेला आरोपी पती चिठ्ठी लिहून फरार : प्रेमविवाह असूनही चारित्र्यावर घेतला संशय
पिंपरी : तलाठी असलेल्या पतीने चारित्र्यावर संशय घेऊन डॉक्टर असलेल्या पत्नीचा चाकूने वार करून डोक्यात हातोडीने मारून निर्घृण खून केला. ती मला साथ देत नव्हती, त्यामुळे मला टोकाची भूमिका घ्यावी लागली, मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहून तलाठी पती फरार झाला. बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सोमवारी (दि. ६) सकाळी ही घटना उघडकीस आली.
सरला विजय साळवे (वय ३२), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विजयकुमार साळवे (वय ३५, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सरला ही भंडारा जिल्ह्यातील होती. तर आरोपी आरोपी विजयकुमार हा गोंदीया जिल्ह्यातील आहे. सरला व विजय यांचा २०१९ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मयत सरला ही पुणे येथील नायडू हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. तर आरोपी विजयकुमार हा जुन्नर तालुक्यातील आळेगावात तलाठी आहे.
मयत सरला आणि तिचा आरोपी पती विजयकुमार यांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे फ्लॅट खरेदी केला. नवीन फ्लॅटची शनिवारी (दि. ४) वास्तूशांत केली. त्यानंतर सरला व विजयकुमार हे दोघेही तेथेच मुक्कामी थांबले. मात्र त्या दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे त्यांच्या नातेवाईक व मित्रांच्या निदर्शनास आले. काही जणांनी रविवारी (दि. ५) त्यांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क झाला नाही. त्यामुळे साळवे यांच्या मित्रांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पाहणी केली असता साळवे यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. त्यामुळे चावीवाल्याकडून चावी तयार करून कुलूप उघडून घरात पाहणी केली. त्यावेळी घरात सरला जखमी अवस्थेत दिसून आल्या. त्यामुळे त्यांना पिंपरी येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांना मिळाली ‘चिठ्ठी’
आरोपी पती विजयकुमार याला पत्नी डाॅ. सरला यांच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. ती मला साथ देत नव्हती, त्यामुळे मला टोकाची भूमिका घ्यावी लागली. मला माफ करा, अशा आशयाचा मजकूर असलेली आरोपी विजयकुमार याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली.
प्रेमाला लागली दृष्ट
उच्चशिक्षित असलेल्या मयत सरला आणि आरोपी विजयकुमार यांनी प्रेमविवाह केला. सुखी संसाराला सुरुवात झाली. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच आरोपी विजयकुमार याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि तेथेच त्यांच्या प्रेमाला दृष्ट लागली. तरीही त्यांनी बोऱ्हाडेवाडी येथे नवीन फ्लॅट खरेदी करून त्याची वास्तूशांतही केली. मात्र मनातील संशय विजयकुमारला शांत बसू देत नव्हते.