महापालिका कर्मचारी साकारणार समाजप्रबोधनपर लघुपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 08:33 PM2018-06-12T20:33:18+5:302018-06-12T20:33:18+5:30
लघुपटामध्ये काम करणारे सर्व कलाकार महापालिकेचे कर्मचारी आहेत.
पुणे : महापालिका कर्मचारी व पीएमसी एम्प्लॉईज युनियन यांच्या वतीने समाज प्रबोधनपर विषयावर लघुपट साकारण्यात येणार आहे. त्या लघुपटासाठी २ लाख ९९ हजार रुपयांचा निधी देण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कर्मचा-यांच्या वतीने एकूण ३० मिनिटांचा हा लघुपट असणार आहे.
या लघुपटामध्ये सचिन नावाच्या एका गरीब मुलाची गोष्ट दाखविण्यात आली आहे. ज्याचे सचिन तेंडूलकर सारखा क्रिकेटर होण्याचे स्वप्न आहे. त्याचे हे स्वप्न पूर्ण होते की नाही ते या लघुपटातून मांडण्यात येणार आहे. या लघुपटामध्ये काम करणारे सर्व कलाकार महापालिकेचे कर्मचारी आहेत. तसेच बालकलाकार देखील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असणार आहेत. सर्व सेवक या लघुपटाचे काम आपले दैनंदिन काम सांभाळून कार्यालयीन वेळेनंतर आणि सुट्टीच्या दिवशी करणार आहेत. महापालिकेच्या जागा ज्या ज्या इमारतीमध्ये लघुपटाचे चित्रीकरण होणार आहे. त्या जागा चित्रीकरणासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.
कर्मचा-यांनी यापूर्वी सन २०१० मध्ये ‘फ्लायओव्हर’ हा लघुपट बनविला होता. रेल्वे रुळ ओलांडताना नागरिकांनी रेल्वे पूलाचा वापर करावा आणि अपघात टाळावेत या सामाजिक विषयावर समाजप्रबोधन करण्यासाठी २२ मिनिटांचा लघुपट केला होता. या लघुपटाला अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यानंतर आता दुसरा लघुपट करण्यात येत आहे.