भोर औद्योगिक वसाहतीची आता ‘सोशल’ चर्चा
By admin | Published: December 27, 2016 03:10 AM2016-12-27T03:10:50+5:302016-12-27T03:10:50+5:30
निवडणुका आल्या की भोर तालुक्यात चर्चा सुरू होते ती औद्योगिक वसाहतीची. राजकारणी त्याचा निवडणुकीपुरता पुरेपूर वापर करतात आणि निवडणुका झाल्या, की प्रश्न सोडून
भोर : निवडणुका आल्या की भोर तालुक्यात चर्चा सुरू होते ती औद्योगिक वसाहतीची. राजकारणी त्याचा निवडणुकीपुरता पुरेपूर वापर करतात आणि निवडणुका झाल्या, की प्रश्न सोडून देतात. आता तरुणांनीच ही मागणी पुढे रेटण्यास सुरुवात केली असून, यात राजकारण न करता प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची मागणी सुरू झाली आहे. सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगू
लागली आहे.
भोर हे संस्थानकालीन अग्रेसर राहिलेले शहर असून, ठाकरसी ग्रुपने फोम लेदरमध्ये मार्केट मिळवले तर आरलॅब्जने रंग तयार करुन रशियाची बाजारपेठ मिळवली आणि भोरचे नाव जगाच्या नकाशावर नेले. बॉम्बे नेट, स्टील ग्रुप टेप, सहकारी सुतगिरणी, भोर शहरातील ३७ एकरावरील मिनी औद्योगिक वसाहत अशा सर्व ठिकाणी सुमारे ४ ते ५ हजार कामगार शेती करुन घरप्रपंच संभाळून काम करीत होते. सर्व काही अलबेल होते.
१९९० नंतर जागतिकीकरण, आर्थिक मंदी, कामगार संघटनांचा वाद यांसारख्या अनेक कारणांमुळे भोर शहराजवळचे उद्योग-व्यवसाय, कारखाने एकामागून एक बंद पडल. नुसते बंदच झाले नाही, तर इमारतीही जमीनदोस्त झाल्या. एकेकाळी कामगारांच्या वावराने फुलून जाणारा परिसर सुनसान झाला. याच कारणाने भोरच्या बाजारपेठेवर मंदीचे सावट येऊन आर्थिक उलाढाल मंदावली. लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे हातात दाम नाही. सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढत गेले. उद्योगधंदा उरला नाही त्यामुळे अनेकांनी स्थलांतर केले. तालुक्याचा पश्चिम भाग दुर्गम डोंगरी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. यामुळे नोकरी, कामधंद्यासाठी भोरसोडुन स्थलांतर करावे लागले.
जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, मावळ, मुळशी तालुक्यांचा शेजारचा खंडाळा, वाई तालुक्यांत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाल्याने सदर तालुक्याचा झपाट्याने विकास झाला. मात्र भोर पुण्यापासून ५० किलो मीटरवर असतानाही आहे त्या औद्योगिक वसाहती बंद झाल्याने भोर, वेल्हे तालुक्यांचा फारसा विकास झाला नाही. तो खुंटत गेला. भोर शहरातील ३७ एकरावर असलेली मिनी औद्योेगिक वसाहत बंद पडली आहे. ती पुन्हा सुरू करावी आणि तालुक्यात नवीन औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) सुरू करण्याची मागणी बेरोजगार तरुण युवक करीत आहेत. निवडणुका आल्या की राजकीय पक्ष भोर तालुक्यातील तरुण बेकार झाले असून, त्यांना काम मिळावे म्हणून तालुक्यात नवीन औद्योगिक वसाहत सुरु करण्याची घोषणा केली जाते. निवडणुका संपल्या की सदरची घोषणा ही घोषणाच राहते. त्याची आठवण पुढच्या पाच वर्षांनी निवडणुका आल्यावरच राजकीय नेत्यांना होते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी एमआयडीसीचे निवडणुकीपुरते भांडवल न करता सर्वांनी एकत्र येऊन राजकारणविरहित औद्यौगिक वसाहत व्हावी यासाठी प्रयत्न करायला हवेत तरच ते शक्य होणार आहे.
पर्यटनदृष्टीनेही विकास व्हावा...
१ भोर, वेल्हे तालुक्यांत औद्योगिक वसाहती करण्यासह येथील निर्सगसौंदर्य, घाट, गडकोट किल्ले, धार्मिक स्थळे इतिहासकालीन, संस्थानकालीन वाडे, मंदिरे, धरणे यांचा विकास केल्यास तालुक्यात पर्यटनदृष्टीने वाढ होणार आहे.
२ भोर शहर व तालुक्यात सध्या लक्ष एमआयडीसी नावाचा ग्रुप तरुणांनी एकत्र येऊन केला आहे. त्या माध्यमातून एमआयडीसी करावी म्हणून तरुणांत जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. सदरच्या चळवळीत दिवसेंदिवस तरुणांचा सहभाग वाढत असून राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या निवडणुकांवर याचा परिणाम जाणवेल अशीही चर्चा सर्वत्र सध्या
सुरु आहे.