शाई फेकली म्हणून माणुस काय मरतो काय? ३०७ कलम लावणे चुकीचे- छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 08:54 PM2022-12-11T20:54:14+5:302022-12-11T20:59:18+5:30
महाराष्ट्रात सातत्याने छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत चुकीची विधाने केली जात आहेत.
पिंपरी: पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी शाई फेकण्याची घटना घडली. या प्रकाराचे समर्थन करणार नाही. पण असं का कशामुळे घडले, याचाही विचार करायला हवा. महाराष्ट्रात सध्या सातत्याने छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत सातत्याने चुकीची विधाने केली जात आहेत. फुले, शाहू आंबेडकर यांच्यावर जो चिखलफेक, बदनामी करेन. त्यागोष्टीचा जो विरोध करेन तो आपला आहे. शाई फेकली म्हणून माणुस काय मरतो काय? आंदोलनकांवर खुनी हल्ला ३०७ कलम लावणे चुकीचे आहे, अशी टीका राष्टवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
पिंपरी-चिंचवड शहर राष्टवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या विचार वेध प्रशिक्षणात भुजबळ बोलत होते. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, आझम पानसरे आदी उपस्थित होते. भूजबळ म्हणाले, ‘‘राज्यात राज्यपाल, लोढा, सुधाशु त्रिवेदी, चंद्रकांत पाटील अशा विविध नेत्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विरोधात काहीही बोलले जात आहे. हे लोक कशासाठी बोलताहेत. शिवरायांनी माफीपत्र दिले होते. तुम्हाला काय माहित. शिवरायांचा जन्म कुठे झाला. त्यांची कर्मभूमी कोणती हे ज्यांना माहित नाहीत. ते हिंदुत्ववादी म्हणून मिरवत आहेत. राष्टÑपुरूषांची बदनामी सुरू आहे. आंदोलन केले म्हणून खुन्नी हल्यांचा गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे.’’
हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी
छगन भूजबळ यांनी हिंदु आणि हिंदुत्ववादी कोण कसे हे सांगताना, ‘‘शिवराय हे हिंदुच त्यांच्या राज्याभिषेकास विरोध करणारे हिंदुत्ववादी. तुकोबा हे हिंदुच, त्यांची गाथा बुडविणरे हिंदुत्ववादी. संत ज्ञानेश्वर महाराज हे हिंदू, त्यांना वाळीत टाकणारे हिंदुत्ववादी, छत्रपती शाहू महाराज हिंदू. त्यांच्या मृत्यूनंतर जल्लोष करणारे हिंदुत्ववादी. महात्मा गांधी हे सनातनी हिंदू, त्यांना मारणारे हिंदुत्ववादी. असा नवीन हिंदुत्ववाद निर्माण होत आहे. ज्योतिबा फुले यांनी भीक मागितली, असे विधान न शोभणारे आहे. ते समाजसुधारक आणि उद्योगपती होते. त्यांनी कधीही भिक मागितली नाही. महागाई, दरवाढ, बेरोजगारी विरोधात बोलले की इडी, सीबीआय लावली जाते. ही दादागिरी सुरू आहे. कारखाने खासगी उद्योग गुजरातला गेले. गावं कर्नाटकाला आणि मंत्री गुवाहटीला. हे खोके सरकार आहे,’’ अशी टीका केली.