Kidney Transplant: कोणी किडनी देतंय का किडनी? देशभरात पावणे दोन लाख रुग्ण प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 01:45 PM2022-05-22T13:45:16+5:302022-05-22T13:45:42+5:30
ज्ञानेश्वर भाेंडे पुणे : देशात किडनी, यकृत, हृदय, फुप्फुस व स्वादुपिंड या अवयवांसाठी तब्बल ३ लाख १७ हजार रुग्ण ...
ज्ञानेश्वर भाेंडे
पुणे : देशात किडनी, यकृत, हृदय, फुप्फुस व स्वादुपिंड या अवयवांसाठी तब्बल ३ लाख १७ हजार रुग्ण प्रतीक्षेत आहेत. यापैकी सर्वाधिक १ लाख ७५ हजार (५५ टक्के) रुग्ण हे किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांपैकी केवळ दहा टक्केच रुग्णांना अवयव प्राप्त हाेतात. तर उरलेले ९० टक्के रुग्ण हे अवयव न मिळाल्याने मृत्यू पावतात. त्यामुळे अवयवदानाचा टक्का वाढण्याची गरज निर्माण झाली आहे.
रूबी हाॅल क्लिनिकमधील किडनी प्रत्याराेपणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. या घटनेवरून अवयव प्रत्याराेपण, या रुग्णांची संख्या तसेच त्याअनुषंगाने इतर मुद्दे चर्चेत आले आहेत. सध्या विविध कारणांमुळे मानवी अवयव निकामी हाेण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यापैकी किडनी (मूत्रपिंड) हा अवयव निकामी हाेण्याचे प्रमाण तर सर्वाधिक आहे. एकूण अवयव हवे असलेल्या रुग्णांपैकी किडनीच्या रुग्णांची संख्या ही जवळपास ५५ टक्केहून अधिक आहे.
अवयव प्रत्याराेपणासाठी जीवंत दाते आणि ब्रेन डेड किंवा मृत्यूपश्चात असे दाेन प्रकारचे अवयव दाते असतात. देशात जीवंत दात्यांचे प्रमाण हे ८० टक्के, ब्रेनडेड दात्यांचे प्रमाण २० टक्के आहे. जीवंत दात्यांमध्ये किडनी, यकृत हे अवयवदान करतात. कारण यानंतरही दाते जीवंत राहू शकतात. तर ब्रेनडेड दाते हे हृदय, फुप्फुस, स्वादुपिंड यांचे दान करतात. कारण हे अवयव दात्याला जीवंत राहण्यासाठी आवश्यक असतात म्हणून ते मृत्यूपश्चात करता येतात.
खासगी रुग्णालयांत सर्वाधिक प्रत्याराेपण
ग्लाेबल ऑब्सव्हेटरी ऑन डाेनेशन ॲड ट्रान्सप्लांटेशन (जीओडीटी) ही जागतिक स्तरावर हाेणारे अवयवदान आणि प्रत्याराेपण समन्वय साधणारी संस्था आहे. या संस्थेच्या अहवालानुसार एकूण प्रत्याराेपण शस्त्रक्रियांपैकी सर्वाधिक म्हणजे ८० टक्के शस्त्रक्रिया या खासगी रुग्णालयांत तर केवळ २० टक्के शस्त्रक्रिया या शासकीय रुग्णालयांत हाेतात.
देशभरात सन २०१३ ते २०१९ दरम्यान विविध अवयव मिळून ६१ हजार ८२१ प्रत्याराेपण करण्यात आले. यापैकी ४८ हजार ६४ किडनी प्रत्याराेपण झाले. यापैकी ४१ हजार १९७ किडनी प्रत्याराेपणांत जिवंत दात्यांनी किडनी दान केली, तर उर्वरित ६ हजार ८६६ रुग्णांना ब्रेन डेड रुग्णांकडून किडनी मिळाली, तर ११ हजार ९७१ यकृत प्रत्याराेपण झाले असून त्यापैकी ८ हजार ४०५ जिवंत दाते, तर ३ हजार ५६६ हे ब्रेन डेड दाते होते, तर हृदयाचे १ हजार ८२ , फुप्फुसाचे ५७३, स्वादूपिंड १०० आणि आतड्याचे ८ प्रत्याराेपण झाले आहे.
देशात सद्य:स्थितीला अवयव प्रत्याराेपणासाठी एकूण तीन लाख १७ हजार ५०० रुग्ण प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी सर्वसाधारणपणे दरवर्षी दहाच टक्के नागिरकांना अवयव मिळतात, तर ९० टक्के रुग्ण हे अवयव न मिळाल्यामुळे मृत्यू पावतात. त्यामुळे, अवयव प्रत्याराेपण प्रक्रिया साेपी हाेणे तसेच अवयवदान वाढणे गरजेचे आहे.
- डाॅ. विवेक कुटे, सचिव, ‘इंडियन साेसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन’
देशातील अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची इंडियन साेसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन या संस्थेने जारी केलेली अंदाजित आकडेवारी
अवयव - किडनी, यकृत, हृदय, फुप्फुस, स्वादूपिंड एकूण
प्रतीक्षेत रुग्ण - १,७५,००० - ४०,००० - ५०,००० - ५०,००० - २,५०० - ३,१७,५००
२०२० मध्ये झालेले प्रत्याराेपण - ७९३६ - १९४५ - २४१ - १९१ - २५ - १०,३३८
प्रत्याराेपण केंद्र - २४० - १२५ - २५ - १० - ३५ - ४२५
पुणे विभागात १५५० रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत
पुणे विभागीय अवयव प्रत्याराेपण समन्वय समितीकडे (झेडटीसीसी) उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार पुणे विभागात (पुणे, साेलापूर, सातारा, सांगली, नाशिक, धुळे, जळगाव व अहमदनगर) १५५० रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत, तर यकृत ७००, हृदय ५३ आणि इतर अवयवांचे ८५ रुग्ण प्रतीक्षा यादीत आहेत, अशी माहिती पुणे झेडटीसीसीच्या समन्वयक आरती गाेखले यांनी दिली.