युनिक आयडी देता का कुणी युनिक आयडी; दिव्यांगांचे ३१ हजार अर्ज प्रलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 09:14 AM2023-04-29T09:14:17+5:302023-04-29T09:14:41+5:30
दिव्यांगांचे ३१ हजार अर्ज अद्याप प्रलंबित
प्रज्वल रामटेके
लाेकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आगामी काळात दिव्यांग प्रमाणपत्राबरोबरच ‘युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड’ (यूडीआयडी) अर्थात युनिक ओळखपत्र असल्याशिवाय दिव्यांगांना कोणत्याही शासकीय सोयी-सुविधांचा तसेच सवलतींचा लाभ घेता येणार नाही. मात्र, हे युनिक ओळखपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांची परवड हाेत आहे. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आतापर्यंत १ लाख १९ हजार ६५ अर्ज आले असून, त्यापैकी ५९ हजार २४ जणांची प्रकरणे मंजूर झाली आहेत; परंतु त्यांना अद्याप यूडीआयडी कार्ड मिळालेले नाही, तर ३१ हजार ४४१ अर्ज अजूनही प्रलंबित आहेत.
फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने २०१२ साली ‘एसएडीएम’ ही संगणकीय प्रणाली विकसित केली. पुढे २०१८ पासून भारत सरकारच्या स्वावलंबन प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येऊ लागले. यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्रासोबत ‘यूडीआयडी’ अर्थात वैश्विक कार्ड देण्यात येते.
यापूर्वीच्या ‘एसएडीएम’ या संगणकीय प्रणालीद्वारे कायमस्वरूपी तसेच तीव्र स्वरूपातील दिव्यंगत्व असणाऱ्या दिव्यांगांनाही सुधारित प्रणालीद्वारे प्रमाणपत्रासाठी पुन्हा तपासणी करावी लागत असल्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र वितरणातील अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत.
दिव्यांग प्रमाणपत्र देणारी रुग्णालये : १३
nअर्ज प्राप्त : १ लाख १९ हजार ६५
nमंजूर अर्ज : ५९ हजार २४ पण कार्ड मिळालेले नाही
nप्रलंबित अर्ज : ३१ हजार ४४१
पूर्वीच्या एसएडीएम संगणकीय प्रणालीतील तीव्र व कायमस्वरूपी दिव्यंगत्व असणाऱ्या दिव्यांगांना स्वावलंबन प्रणालीतील प्रमाणपत्र व यूडीआयडी कार्ड मिळविण्यासाठी पुन्हा तपासणी न करता मिळावेत. दिव्यंगत्व प्रमाणपत्रासाठी दिलेल्या मुदतीमध्ये तपासणी करून प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत. जिल्ह्यातील दिव्यांगांचे प्रवर्गनिहाय सर्वेक्षण आणि स्वावलंबन प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर केल्या पाहिजेत.
- हरिदास शिंदे, अध्यक्ष, संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती, पुणे.
सिस्टीमच्या मर्यादा आहेत. दिवसाला १०० जणांनाच कार्ड देऊ शकताे. ज्यांना नंबर दिले आहेत ते लवकर येत नाहीत किंवा त्यांचा प्रतिसादही मिळत नाही. यामुळे यूडीआयडी कार्ड प्रलंबित राहतात, असे समाजकल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.