कोणी ‘पाणी देता का, पाणी?’, शासनाची उदासीनता मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 06:14 AM2018-05-03T06:14:43+5:302018-05-03T06:14:43+5:30
कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण झालेली झाडेझुडपे, दुर्मिळ झालेले पाणीसाठे आदींमुळे मुक्या पशुपक्षी, वन्यप्राण्यांना आपल्या
राजेगाव : कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण झालेली झाडेझुडपे, दुर्मिळ झालेले पाणीसाठे आदींमुळे मुक्या पशुपक्षी, वन्यप्राण्यांना आपल्या जिवाला मुकावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागातील वनविभागाच्या क्षेत्रात पाहायला मिळताना सध्या दिसत आहे. मानवी जीव आपली तहानभूक कसेही भागवतील; मात्र हे मुके वन्यजीव ‘कुणी पाणी देता का पाणी?’ अशी हाक कोणाला मारणार?
सध्या उन्हाची चाहूल अधिक वाढल्याने मानवी शरीराची लाही लाही होताना दिसत आहे. त्यातच इथले काही विहिरी, कूपनलिकासुद्धा कोरड्या पडू लागल्या आहेत. या भागाला भीमा नदीपात्राचा आधार आहे. तोही आता कमी कमी होऊ लागला आहे. त्यामुळे मानवी जीवनाला देखील यंदा विचार करण्याची वेळ आली. वन्यप्राण्यांना ओला चारा मिळणे तर दूरच; पण आपली तहान भागवण्यासाठी थोडे पाणीही उपलब्ध होत नाही, याची मोठी खंत निसर्गप्रेमींना वाटत आहे. आपला वनातील अधिवास सोडून हे वन्यजीव आपल्या जिवाची तमा न बाळगता पोटापाण्यासाठी थेट लोकवस्तीत येऊ लागल्याचे मोठे आश्चर्य दिसून येत आहे. वन्यप्राण्यांचे संवर्धन व्हावे यासाठी शासन कार्य करत असतानादेखील शासनाची ही उदासीनता या मुक्या प्राण्यांच्या जिवावर बेतत आहे.
राजेगावच्या परिसराला मोठ्या प्रमाणावर वन व उजनी क्षेत्र लाभलेले आहे. या क्षेत्रात प्रामुख्याने ससे, मोर, लांडगा, कोल्हा, हरीण-काळवीट आदी विविध जातीचे पशुपक्षी दिवसाढवळ्या राजेगावनजीक मानवी वस्त्यांवर भटकंती करत अनेक दुर्घटनांचे बळी ठरत आहेत. यासाठी या वन्यप्राण्यांची मानवी वस्तीतील भटकंती थांबवण्यासाठी शासनस्तरावर जागोजागी पाणवठे करण्याची मोहीम जलद गतीने सुरु होणे खूप गरजेचे आहे.
सध्या सोशल मीडियावर पशुपक्ष्यांच्या बचावासाठी जागृती करणारे अनेक संदेश लोकांपर्यंत पोहोचत आहेत. यामधून पक्ष्यांना धान्य व पाणी ठेवण्याचे मोठे सत्कार्य अनेक नागरिक करत आहेत. येथील पक्षिप्रेमी यांनी सोशल मीडियातच नव्हे तर प्रत्यक्षात शाळा, विद्यालये आदींमध्ये हे उपक्रम राबवून पक्षी बचावाचे संदेश देत आहेत. शासनानेदेखील अशा वन्यजीव व पशुपक्ष्यांच्या जिवासाठी उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे. निसर्गातील या जिवांना चारा व पाणी देऊन जगवण्याची जबाबदारी आपलीच हेपण तेवढेच खरे ना!