कुणी रायटर देतं का रायटर ? अंध विद्यार्थ्यांची समाजाकडे मदतीची हाक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 07:39 PM2021-04-09T19:39:24+5:302021-04-09T19:40:02+5:30

दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना रायटर मिळणे झाले कठीण 

Does anyone pay for a writer? Blind students call for help in society | कुणी रायटर देतं का रायटर ? अंध विद्यार्थ्यांची समाजाकडे मदतीची हाक 

कुणी रायटर देतं का रायटर ? अंध विद्यार्थ्यांची समाजाकडे मदतीची हाक 

Next
ठळक मुद्देअनेकांनी कोरोनाच्या भीतीपोटी दिला नकार 

अतुल चिंचली- 

पुणे: दहावी - बारावीची परीक्षा तोंडावर आली असताना अंध विद्यार्थ्यांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरवेळी महाविद्यालय, विविध संस्थांकडून यांना पेपर लिहिण्यासाठी रायटर मिळवून दिले जातात. पण यंदा दोन महिन्यापासून आतापर्यंत एकही रायटर न मिळाल्याचे अंध विद्यार्थ्यांनी लोकमतला सांगितले आहे. जानेवारी महिन्यात या अंध विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेचा फॉर्म भरला होता. दरवर्षीप्रमाणे या फॉर्मसोबतच त्यांना रायटर मिळण्याबाबतचा फॉर्मही भरून द्यावा लागतो. त्याचप्रमाणे यावर्षी त्यांनी रायटरचाही फॉर्म भरला. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून एकही रायटर उपलब्ध झाला नाही, असेही ते म्हणाले.

पुणे शहरात आताच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून फॉर्मही भरून घेण्यात आले आहेत. शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयात दहावी बारावीची अंध मुले शिकत आहेत. त्यांना पेपर लिहिण्यासाठी रायटरबाबत अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नववीचा विद्यार्थी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीचा विद्यार्थी रायटर असणे बंधनकारक आहे. 
सद्यस्थितीत अंध विद्यार्थ्यांना कोरोनामुळे रायटर मिळत नाही.

बीड येथे राहणारा करण अंबाड म्हणाला, पुण्यातील वाडिया महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दरवर्षी आम्हाला रायटर मिळण्यास अडथळे येत नाहीत. संस्था अथवा महाविद्यालयाच्या मदतीने रायटर मिळून जातात. पण यंदा अनेकांची तयारी नसल्याचे दिसून येत आहे. कोविडमुळे पेपरला तीन तास बसण्याची त्यांची मानसिकता नाही. तसेच त्यांच्या घरातून नकार दिला जात आहे. कॉलेजकडूनही सध्या रायटर शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. कोविडमुळे हे कठीण झाले आहे. 
......................................
एक दीड महिन्यापासून रायटर शोधत आहे. पण कोणच तयार होत नाही. अनेकांनी कोरोनाची कारणे दिली आहेत. आम्ही आमच्या मूळगावी आलो आहोत. त्यामुळे येथून आम्हाला रायटर शोधण्यासाठी फोनवरच संपर्क साधावा लागत आहे. अशा परिस्थितीत लोकांची रायटर होण्याची मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे. समाजातून आम्हाला रायटर मिळण्याची अपेक्षा आहे.

ऋषीदास शिंदे, अंध विद्यार्थी
                          
...............
अंध विद्यार्थ्यांसाठी रायटरबाबत हा नेहमीच अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. त्यातून सर्वत्र कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही अभ्यासवर पूर्णपणे लक्षकेंद्रित केले आहे. पण गेल्या दोन महिन्यापासून रायटर मिळत नाहीयेत. त्यामुळे परीक्षा कशी घ्यावी, असा प्रश्न पडला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत रायटर मिळण्यासाठी आमची धावपळ सुरू आहे. 
                           अथांग भंडारी 
                            अंध विद्यार्थी

Web Title: Does anyone pay for a writer? Blind students call for help in society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.