कुणी रेल्वे सुरू करता का रेल्वे? अधिकारी-कर्मचारी हतबल, मोठा आर्थिक भुर्दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 02:09 PM2020-06-20T14:09:33+5:302020-06-20T14:16:14+5:30
कोरोना संकटामुळे जवळपास तीन महिन्यांपासून पुण्या-मुंबई दरम्यानची एसटी तसेच रेल्वे सेवा बंद..
पुणे : मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अन्य कार्यालयांनीही सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे दररोज पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. बहुतेकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करून त्यांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे किमान सरकारी कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील इतर कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या धर्तीवर इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.
कोरोना संकटामुळे जवळपास तीन महिन्यांपासून पुण्या-मुंबईदरम्यानची एसटी तसेच रेल्वे सेवा बंद आहे. नोकरी तसेच व्यवसायानिमित्त दररोज पुणे-मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पुण्यातून सकाळी मुंबईच्या दिशेने धावणारी डेक्कन क्वीन, प्रगती, सिंहगड, डेक्कन एक्सप्रेस या गाड्या प्रवाशांनी भरून जातात. त्यामध्ये मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय यांसह विविध शासकीय कार्यालये, बँक, खासगी कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी तसेच व्यावसायिक, वकील यांचा समावेश असतो. लॉकडाऊनमुळे सेवा ठप्प झाल्यानंतर पुणे-मुंबई प्रवास बंद झाला. संबंधितांना कामावर हजर न राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अडचणी येत नव्हत्या. पण आता अनलॉकमध्ये मंत्रालयासह मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहणे बंधनकारक केले आहे.
-----------------
मुंबईला रोज जावे लागत असल्याने चार-पाच जणांना एकत्र येऊन खासगी वाहन करावे लागते. त्यासाठी ५ ते ६ हजार रुपये रोजचा खर्च येत आहे. खासगी वाहनाशिवाय दुसरा काहीच पर्याय नसल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. त्यामुळे किमान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सुरू करणे आवश्यक आहे.
- अंकिता देशपांडे, कर्मचारी, मुंबई महापालिका
-------------
पुर्वी आठवड्यातून एकदाच कार्यालयात जावे लागत होते. पण आता दररोज जावे लागत असल्याने तीन-चार जणींमध्ये मिळून खासगी वाहनाने जावे लागत आहे. प्रत्येकी जवळपास दीड हजार खर्च येत आहे. दररोज मुंबईला येणारे अनेक जण आहेत. त्यांच्यासाठी रेल्वे किंवा बसची व्यवस्था करणे गरजेचे आहे. रेल्वे सुरू झाली तर अनेकांची गैरसोय टळेल.
- रोहिणी दणाणे, कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई
-----------------
एका इंटरसिटी एक्सप्रेसने १३०० ते १५०० प्रवास पुण्यातून मुंबईला जातात. पुण्यातून सकाळी किमान तीन गाड्या मुंबईकडे जातात. या गाड्यांनी दररोज चार ते साडे चार हजार प्रवासी मुंबईला जातात. त्यामध्ये कल्याण, ठाणे, दादर, सीएसटीला जाणारे अनेक नोकरदार, व्यावसायिक आहेत. पण रेल्वेसेवा ठप्प असल्याने खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही.
--------------
पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या रेल्वे -
- डेक्कन क्वीन
- प्रगती एक्सप्रेस
- सिंहगड एक्सप्रेस
- डेक्कन एक्सप्रेस
- इंटरसिटी एक्सप्रेस
- इंद्रायणी एक्सप्रेस
----------------