‘अ’ वर्गातल्या पुणे महापालिकेला राज्य सरकारच्या मदतीची गरज काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:30+5:302021-05-21T04:11:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील महापालिकांमध्ये ‘अ’ वर्ग दर्जामध्ये असलेल्या व आठ हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या पुणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील महापालिकांमध्ये ‘अ’ वर्ग दर्जामध्ये असलेल्या व आठ हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या पुणे महापालिकेला राज्य सरकारच्या आर्थिक मदतीची गरज ती काय? असा प्रश्न माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला.
दरम्यान पुण्याचे महापौर तथा महापालिका आयुक्तांनी आजपर्यंत कोरोना आपत्तीत राज्य सरकारकडे आर्थिक मदतच मागितली नाही तर ती देणार तरी कशी, असा दावाही जगताप यांनी या वेळी केला.
पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना आपत्तीच्या गेल्या १४ महिन्यांत पुण्याला १४० कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याचे जगताप म्हणाले. पुणे महापालिकेला राज्य शासनाने काय दिले, महापालिकेतील विरोधी पक्ष म्हणून तुम्ही पुणेकरांसाठी काय मदत राज्य सरकारकडून आणली, असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर जगताप म्हणाले की, पुणे महापालिकेने राज्य शासनाकडे लेखी पत्राव्दारे आजपर्यंत आर्थिक मदतीची मागणीच केली नाही.
महापालिका आयुक्तांनीही राज्य सरकारकडून अपेक्षित मदत महापालिकेला नेहमीच मिळाली असल्याचे सांगितले. आम्ही याबाबतची लेखी माहिती आयुक्तांकडून मागवली असल्याचे त्यांनी सांगितले.