श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही; राज ठाकरेंची कुंभ मेळाव्यावर पिंपरीत टीका
By विश्वास मोरे | Updated: March 9, 2025 18:58 IST2025-03-09T18:56:37+5:302025-03-09T18:58:19+5:30
देशातील एकही नदी स्वच्छ नाही, तरीही आम्ही नदीला माता म्हणतो

श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही; राज ठाकरेंची कुंभ मेळाव्यावर पिंपरीत टीका
पिंपरी : मनसेच्या पदाधिकारी बैठकीस काहीजण गैरहजर होते. मग मी त्यांची हजेरी घेतली. तर त्यांनी सांगितले, कुंभला गेला होतो. त्यावर मी त्यांना म्हटलो, करता कशाला पापं. आल्यावर आंघोळ केली ना? कुंभमेळ्याला जाऊन आल्यावर बाळा नांदगावकर यांनी मला कमंडलूमध्ये पाणी दिले.
ते म्हणाले, पिणार का? हड मी नाही म्हटले. देशातील एकही नदी स्वच्छ नाही, तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. श्रद्धेला पण काही अर्थ आहे कि नाही, असे परखड मत मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. कुंभ मेळाव्याच्या मुद्द्यावर ठाकरे यांनि जोरदार फटकेबाजी आणि मिमिक्री करून हसविले.
पिंपरी-चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मनसेच्या १९ व्य वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, किशोर शिंदे, बाबू वागकर, सचिन चिखले उपस्थित होते.
कुंभमेळाव्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, 'राजीव गांधी असल्यापासून मी ऐकतोय गंगा स्वच्छ होणार. मध्ये चित्रपट आला त्यात वेगळीच गंगा. लोक म्हणाले, अशी गंगा असेल तर आम्ही आंघोळ करू.'
महाराष्ट्राचा चिखल झालाय..!
राज ठाकरे म्हणाले, 'गुढीपाडवा मेळाव्यात दांडपट्टा फिरविणार आहे इथे चाकू सुरी का काढू , त्याच सभेत बोलणार. महाराष्ट्राचा चिखल झालाय , राजकारणाने एकमेकांची डोकी फोडायला लावतायत. प्रभू रामचंद्र यांना १४ वर्षाचा वनवास झाला. त्या कालखंडात रावण सीताहरन, रावण वध, राम सेतू बांधला हे सगळं त्यांनी १४ वर्षात केलं आणि आपल्याकडे सी लिंक बांधायला १४ वर्ष लागली. हे सगळं मी सविस्तर बोलणार आहे.'
महिला दिन जिजाऊंच्या नावे साजरा करावा
राज ठाकरे म्हणाले, ' काल महिला दिन झाला. काल एकाने मला जोक पाठवला. २१ जून सर्वात मोठा दिवस. मात्र, महिला दिन सर्वात मोठा दिवस आहे. कारण तो वर्ष भर चालतो. आता तर पुरुष देखील एकमेकांना शुभेच्छा देतात. महिला दिन जिजाऊंच्या नावे साजरे करायला हवे , स्वराज्य उभं राहिलं त्याची खरी प्रेरणा जिजाऊ होत्या हे आपण विसरतो. कारण, पुढारलेल्या स्त्रिया ह्या महाराष्ट्रातच मिळतील.'
ज्या फुटपाथवर जायचं तिथे जावं
'पक्षाला १९ वर्ष झाली. आपण मागोवा घेतला पाहिजे. अनेक पक्षाला प्रश्न पडलाय सगळीकडे अपयश आलेलं असताना मनसे मधली सगळी माणसं एकत्र कशी?
सगळीकडे राजकीय फेरीवाले आले तसे आपण नाहीत. इकडंन डोळा मारला की तिकडे, तिकडंन डोळा मारला की आणखी दुसरीकडे. आपण असे फेरीवाले नाहीत, आपण अख्खा दुकान उभे करू. यापुढे दर १५ दिवसात पक्षाच्या नेत्या पदाधिकाऱ्यांचा कामाचा आढावा घेतला जाणार आहे. कामचुकारपणा दिसला तर त्याला पदावर ठेवणार नाही, त्या नंतर त्याने ज्या फुटपाथवर जायचं तिथे जावं, असा दम राज ठाकरे यांनी दिला.