कोरोना रुग्णांना कोणी हाॅस्पिटल देता का हाॅस्पिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:11 AM2021-03-19T04:11:50+5:302021-03-19T04:11:50+5:30
सुषमा नेहरकर-शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हॅलो.. माझे पती कोरोना पॉझिटिव्ह आलेत त्याना त्रास होतोय चार हाॅस्पिटलमध्ये फिरलो ...
सुषमा नेहरकर-शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हॅलो.. माझे पती कोरोना पॉझिटिव्ह आलेत त्याना त्रास होतोय चार हाॅस्पिटलमध्ये फिरलो पण जागा शिल्लक नाही म्हणून परत पाठवले... हॅलो.. आम्ही दोघे नवरा बायको ज्येष्ठ नागरिक आहोत हो आम्हाला कोरोनाची लागण झाली पण हाॅस्पिटलच मिळत नाही आम्ही काय करू.. प्लीज काही करून हाॅस्पिटलची सोय करा.गुरूवारी दिवसभरात जिल्साधिकारी कार्यालयातील कोरोना कक्षाकडे २० पेक्षा अधिक फोन पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांना हाॅस्पिटल मिळत नसल्याचे आले. यावरून शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट होते.
गेल्या पंधार दिवसांत पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. बुधवारी एका दिवसात गेल्या वर्षभरातील सर्वाधिक म्हणजे तब्बल ४ हजार ७४५ अशी रेकॉर्ड ब्रेक नवीन रुग्णांची भर पडली. हीच परिस्थिती गुरुवारी देखील कायम असून, रुग्ण वाढीची संख्या लक्षात घेता परिस्थिती हाताबाहेर जात असताना दिसत आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दीड हजारांच्या पुढे गेल्यानंतर संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली व तातडीने सर्व खाजगी हाॅस्पिटल, सरकारी हाॅस्पिटल आणि दोन्ही जॅम्बो हाॅस्पिटल सुरू करण्यात आली. परंतु आज जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी तब्बल पाच हजार रुग्णांचा आकडा पार गेला तरी प्रशासकीय यंत्रणेला जाग आली नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली कोविड हाॅस्पिटल अद्यापही सुरू केली नाही. तसेच खाजगी हाॅस्पिटल देखील तेवढी सक्रिय झाले नाहीत. बहुतेक सर्व कोविड केअर सेंटर बंद आहेत. यामुळेच सध्या ७०-८० टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. अद्याप प्रशासकीय यंत्रणा पुढे उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी तयार असताना दिसत नाही.