मलुे पोळी भाजी खायला नकोच म्हणतात का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:27+5:302021-07-09T04:08:27+5:30
पालक समुपदेशक म्हणून काम करताना मला एक अनुभव आला, चार-साडेचार वर्षांची वैष्णवी, एका डॉक्टरची मुलगी हिच्याबद्दल तिची आई ...
पालक समुपदेशक म्हणून काम करताना मला एक अनुभव आला, चार-साडेचार वर्षांची वैष्णवी, एका डॉक्टरची मुलगी हिच्याबद्दल तिची आई सारखीच तक्रार करत हाती. तिने तर, "आई, तुला स्वयंपाक छान करताच येत नाही!" म्हणून मोकळी झाली. तिने आईच्या मागे लागून मला घरी बोलवून घेण्यासाठी फोन करायला लावला. तसा तिच्या आईचा मला फोन आला आणि आई चांगली होती, समंजस होती, स्वतः शिकून घेण्याची तिची मनाची तयारी असलेली मला जाणवली. हे तिच्या संवादातून लक्षात आले. तिने पोळी/चपाती कशी मऊ बनवता, पदर कसे येतात पोळीला ते मला शिकवा म्हणाली. म्हणजे ह्या छोट्याशा मुलीने किती बारीक निरीक्षण केले होते ह्याचे तर मलासुद्धा खूपच आश्चर्य वाटले होते. त्यावरूनच लक्षात येते की मुलांना पोळी भाजीसुध्दा आवडते मात्र हे पदार्थ बनवितानाच मुलांना ते आवडतील कशा व त्याच्या आवडीनुसार आपल्या बनविण्याचा प्रयत्न कसा करता येईल याकडे लक्ष दिलेच पाहिजे.
मध्यंतरी वृत्तपत्रात श्राद्ध पक्षातील विविध पदार्थ यावर एक लेख आला होता, त्यामध्ये म्हटले होते की पूर्वीच्या काळी आहारशास्त्रावर फारशी जनजागृती नव्हती. त्यामुळे लोकांनी पोषक आहार करून खायला हवे. त्यामुळे त्याला विविध रीतीरिवाजांची जोड देत विविध पदार्थ बनविण्याची प्रथा निर्माण केली गेली. एखाद्या आजाराने मृत्यू पावलेल्या माणसांच्या घरातील इतर सदस्यांना तसा आजार लागू नये यासाठी श्राध्दाच्या निमित्ताने घरात ५ भाज्या, लिंबू, कोशिंबिरी, कढी, खीर, वडा, घारगा, चपाती, लिंबू चटणी, थापी वाडी, वडी रसपट, पंचामृत, भातवरण केले जायचे. या सगळ्या गोष्टी पोटात गेल्यामुळे सगळे रस, क्षार, प्रथिने, कर्बोदके, म्हणजे पोषक गोष्टी प्रत्येकाच्या जेवणातून शरीरात अवश्य जातील आणि सगळेच सुदृढ होतील. मात्र आता आहारशास्त्रावर बऱ्यापैकी संशोधन झाले आहे, डाएटिंग वगैरे गोष्टी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या आहार काय असावा व नसावा याची शास्त्रीय माहितीही पालकांना सहज उपलब्ध होते. मात्र मुलांचा चमचमीत खाण्याचा हट्ट दूर करून पालकांनी त्यांना सकस आहार देणे गरजेचे आहे. बऱ्याचदा पालकांच्या तक्रारी असतात की, मुले आई-बाबांचे ऐकत नाहीत, अशा वेळी आहारतज्ज्ञ, डॉक्टर, शाळेतले शिक्षक यांच्याकडूनही त्यांना अशा गोष्टी सांगता येऊ शकतात.
मुलांना आत्तापर्यंत पुरणपोळी, गूळपोळी, विविध प्रकारचे पराठे, थालिपीठ, इडली दोसे, अप्पे, ढोकळा, नारळी भात इ. असे विविध प्रकारचे पदार्थ ते नको म्हटले तरी त्यांना त्याचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांच्या आवडची चव लक्षात घेऊन त्या काळजीपूर्वक बनविणे महत्त्वाचे आहे. हे पाळणाघरात मुले सांभाळताना मी अनुभवले आहे. सध्या समाजातील आहारात कमालीचा बदल झाला आहे, जो घतक आहे हे सगळ्यांना समजते आहे पण वळत नाहीये? प्रवाहविरुद्ध पोहण्याची भीती आहे की काय? असे वाटते! आपल्याकडे जागतिकीकरण झाल्यापासून सगळ्याच बाबतीतील आपल्या रूढीपरंपरा सोडून बाहेरच्या परंपरा स्वीकारून पालक काय मिळवतायेत? हे त्यांच्या लक्षात येत कसे नाही? याचा विचार केला पाहिजे.
...रचना वनारसे...
(पालक मार्गदर्शक
वर्तन समस्या विश्लेषक आणि उपायोजक)