तुरीसाठी बारदाना देता का?
By admin | Published: March 16, 2017 02:03 AM2017-03-16T02:03:15+5:302017-03-16T02:03:15+5:30
मागील वर्षी तुरीचे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे दरदेखील वधारले होते. आता एकरी उत्पादनातदेखील वाढ झाली आहे.
बारामती : मागील वर्षी तुरीचे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे दरदेखील वधारले होते. आता एकरी उत्पादनातदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे बारामतीच्या तूरखरेदी केंद्रावर आवक वाढली आहे. आजअखेर ५ हजार ७६० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. मात्र, ‘नाफेड’कडून आठवडाभरानंतरदेखील बारदाना उपलब्ध होत नाही, अशी स्थिती आहे.
पुणे जिल्ह्यासह शेजारच्या सोलापूर, सातारा, नगर आदी भागांतून तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. बारदान्याअभावी खरेदी थांबविण्यात आली होती. मात्र, पणन राज्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर पुन्हा खरेदी सुरू केली आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने आजअखेर १,४०० क्विंटल तूर खरेदी केली. त्याचे ग्रेडिंग करून मार्केटच्या गोडाऊनमध्ये ठेवलीे.
बारदाना उपलब्ध न झाल्यामुळे बाजार समितीने त्यांचा बारदाना यासाठी वापरला आहे. परंतु, नाफेडकडून बारदाना आजअखेरदेखील मिळत नाही, अशीच स्थिती आहे. कोल्हापूरच्या केंद्रावर २५ हजार पिशव्या बारदाना उपलब्ध होता. तो खरेदी करावा, असे सांगितले होते. परंतु, नाफेडकडून त्याला चांगला प्रतिसाद आला नाही. याच पार्श्वभूमीवर, बारदाना नसताना खरेदी केलेली १,४०० क्विंटल तूर गोडाऊनमध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. त्याला नाफेडने प्रमाणित केलेला बारदाना न मिळाल्यास गोडाऊनमध्ये ठेवलेला माल पुन्हा शेतकऱ्यांना घेऊन जाण्याची वेळ येणार आहे. मागील वर्षी तुरीची आवक कमी झाली होती. त्यामुळे सरकारने खासगी गोडाऊनवर धाडी टाकून बाजारात तूर आणली होती. आता तुरीला भाव चांगला आहे. त्यामुळे बहुतेक भागांत शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाला विशेष महत्त्व दिले. ग्रेडिंग न केलेल्या किरकोळ बाजारात तुरीची खरेदी ४ हजार ते ४,२०० रुपयांनी केली जाते. परंतु, बाजार समितीच्या तूरखरेदी केंद्रावर चाळणी लावून ग्रेडिंग केलेल्या तुरीला प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये दर मिळत असल्याने स्थानिकांसह परिसरातील मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची आवक बारामतीच्या केंद्रावर वाढलेली आहे. आतापर्यंत २ कोटी ८८ लाख रुपयांची तूरखरेदी झाली आहे. त्यातील शेतकऱ्यांना १ कोटी ८८ लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. १ कोटी रुपये देणे बाकी आहे, असे असताना तुरीची एकीकडे आवक वाढत आहे. तर दुसरीकडे, तूर ठेवण्यासाठी बारदानाच उपलब्ध होत नाही. शासनाने केंद्रावर आलेली सर्व तूर खरेदी करावी, असे आदेशच दिले आहेत. त्यामुळे आजअखेर १,४०० क्विंटल खरेदी केलेली तूर गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली आहे. यासाठी नाफेडकडून बारदाना उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांना पुन्हा तूर घरी न्यावी लागेल. या संदर्भात
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले, की तुरीची आवक यंदा वाढली आहे. (प्रतिनिधी)