बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे का ? मुख्यमंत्र्यांचा पवारांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 01:49 PM2019-09-15T13:49:13+5:302019-09-15T13:56:01+5:30
बारामतीमध्ये मुख्यंमंत्र्यांच्या सभेमध्ये झालेल्या गाेंधळाविषयी बाेलताना बारामती मध्ये काय 370 कलम लागू आहे का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी पवारांना केला.
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुण्यात शनिवारी आली. त्याआधी बारामती मध्ये ही जनादेश यात्रा गेली. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाबाबत घेतलेल्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाषणातून टीका सुरू करताच संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घोषणा सुरू केल्या. या कार्यकर्त्यांच्या दिशेने पाेलीस धावून आल्याने पळापळा झाली. याबाबत आज आयाेजित पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता. बारामतीमध्ये पवारांशिवाय काेणी सभा घ्यायची नाही का ? बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
शनिवारी मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा पुण्यात दाखल झाली. त्याआधी बारामतीमध्ये ही जनादेश यात्रा गेली. तेथे मुख्यमंत्र्यांनी पवारांवर टीका सुरु करताच राष्ट्रवादी समर्थकांनी घाेषणाबाजी सुरु केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला हाेता. याबाबत बाेलताना मुख्यमंत्री म्हणाले, काल विराेध करणारे राष्ट्रवादीचे सात ते आठ लाेक हाेते. बारामतीमध्ये पवारांशिवाय काेणी सभा घेऊ नये का, तिथे काय कलम 370 लागू केले आहे का, की बारामती महाराष्ट्राच्या बाहेर आहे ? लाेकशाहीमध्ये सर्वांना सभा घेण्याचा अधिकार आहे. पवारांच्या प्रत्येक सभेत आमच्या सात ते आठ कार्यकर्त्यांनी घाेषणाबाजी केली तर चालेल का ? पवारांनी आमच्या इकडे यावं, सभा घ्यायला आम्ही त्यांना मदत करु असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
तसेच पवारांच्या एवढी काय पायाखालून जमीन सरकतीये की बारामतीमध्ये मुख्यंमत्र्यांनी सभा घेऊ नये असे त्यांना वाटते असा टाेलाही त्यांनी यावेळी पवारांना लगावला.