कुत्र्याचा ३५ नागरिकांना चावा
By admin | Published: July 6, 2017 03:00 AM2017-07-06T03:00:45+5:302017-07-06T03:00:45+5:30
शहरात बुधवारी (दि. ५) पिसाळलेल्या कुत्र्याने ३० ते ३५ नागरिकांना चावा घेतला. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : शहरात बुधवारी (दि. ५) पिसाळलेल्या कुत्र्याने ३० ते ३५ नागरिकांना चावा घेतला. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते.
अप्पासाहेब पवार मार्ग, सिनेमा रोड, भिगवण चौकासह शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. या कुत्र्याने अचानक चावा घेण्यास सुरुवात केल्याने नागरिकांची धावपळ उडाली. मात्र, आक्रमक झालेल्या कुत्र्याने सिनेमा रस्त्यावर ११ जणांना चावा घेतला. त्यामुळे घाबरलेल्या रुग्णांनी खासगी रुग्णालय, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. काही जणांनी खासगी रुग्णालयातदेखील उपचार घेतले.
सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मिरा चिंचोलीकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेले ३० रुग्ण उपचारांसाठी आज रुग्णालयात दाखल झाले होते. या रुग्णांना रेबिज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. सर्वांवर आवश्यक उपचार करण्यात आले आहेत. रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा आहे. नागरिकांनी श्वान दंशाच्या उपचारांसाठी रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे डॉ. चिंचोलीकर म्हणाल्या.
नगरपालिकेचे कर्मचारी, आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत या कुत्र्याचा शोध सुरूच होता.
नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी बारामती शहरातील परिसर पिंजून काढला. शेवटी डॉ. अप्पासाहेब पवार मार्गावर या कुत्र्याला पकडण्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांना यश आले. अनेक नागरिकांना चावा घेऊन घायाळ झालेल्या अवस्थेत हे कुत्रे सापडले.
या पिसाळलेल्या कुत्र्याच्या धुमाकुळामुळे नागरिकांत घबराट पसरली होती.
एकाच वेळी ११ रुग्ण श्वानदंशाच्या उपचारांसाठी रग्णालयात आले होते. त्यांच्यावर तातडीने आवश्यक उपचार करण्यात आले. या सर्वांना कुत्र्याने चांगलाच चावा घेतला आहे. सर्वांना कुत्र्याचे दात लागल्याने जखम झाली आहे. त्यापैकी एका रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- डॉ. अंजली खाडे