पोलिसांबरोबर श्वानही आॅन ड्युटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 03:21 AM2018-09-20T03:21:57+5:302018-09-20T03:22:13+5:30
श्वान पथकावरही अतिरिक्त बंदोबस्ताची जबाबदारी
पुणे : गणेशोत्सवात देशकंटकांकडून काहीही घातपाती कृत्य होऊ नये, म्हणून पोलीस दल डोळ्यात तेल घालून सतर्क असते़ त्यांच्याबरोबरच बाँबशोधक आणि नाशक पथकातील प्रशिक्षित श्वानही आता दिवसरात्र आॅन ड्युटीवर आहेत़ या श्वान पथकाकडून मानाचे गणपती व महत्त्वाची गणेश मंडळे यांची तपासणी दररोज केली जात असल्याने या श्वान पथकावरही अतिरिक्त बंदोबस्ताची जबाबदारी आली आहे़
पोलिसांप्रमाणेच श्वानांनादेखील त्यांचे काम वाटून देण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या बांँब शोधक-नाशक पथकाकडून ८ पथके तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पथकाबरोबर एक श्वान असून मानाची मंडळे तसेच प्रमुख मंडळाचा मांडव, गर्दीच्या परिसराची तपासणी करण्यात येत आहे. उत्सवाच्या कालावधीत सकाळी, सायंकाळी आणि मध्यरात्रीदेखील श्वान पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे. गणपतीच्या दर्शनासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येतात. त्यामुळे या भागातील बंदोबस्ताची विशेष जबाबदारी श्वानांवर असते. सूर्या, लिमा, तेजा, धु्रव, टायसन, इको, विराट हे श्वान सहभागी झाले आहेत. त्यांच्याबरोबर प्रशिक्षक आणि बाँबशोधक पथकातील पोलिसांकडून परिसराची तपासणी करण्यात येत आहे.