महापालिकेचे नवीन सभागृह भटक्या कुत्र्यांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 08:08 PM2018-09-12T20:08:41+5:302018-09-12T20:16:54+5:30
उद्घाटनाच्या कार्यक्रमातच सभागृहाला गळती लागल्याने हसे झाल्यानंतर आता सभागृहात भटकी कुत्री झोपत असल्याचे उघडकीस आले आहे.
पुणे: कोट्यवधी रुपये खर्च करून उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्याच्या उपस्थित उद्घाटन केलेल्या नवीन विस्तारीत प्रशासकीय इमारतीमधील सभागृह आता चक्क भटक्या कुत्र्यांचा अड्डा बनला आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमातच सभागृहाला गळती लागल्याने संपूर्ण देशासमोर हसे झाल्यानंतर आता सभागृहात भटकी कुत्री झोपत असल्याचे उघडकीस आले आहे.
महापालिकेच्या वतीने तब्बल ४९ कोटी रुपये खर्च करून नवीन विस्तारीत इमारत बांधली आहे. या इमारतीचे उद्घाटन जुलै महिन्यात देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. केवळ कोनशिलेवर नाव लागण्यासाठी भाजपच्या पदाधिका-यांनी काम अपूर्ण असताना घाईघाईने इमारतीचे उद्घाटन करण्याचा घाट घातला. परंतु या घाईमुळे उद्घाटनाच्या दिवशीच इमारतीला गळती लागील. यामुळे संपूर्ण देशासमोर पुणे महापालिकेचे हसू झाले. उद्घाटन होवून दोन महिने लोटले तरी अद्याप कामकाच पूर्ण झाले नाही. तसेच उद्घाटनानंतर येथे अद्याप कोणतेही कामकाज सुरु झालेले नाही. त्यामुळे नवीन विस्तारीत इमारत भटक्या कुत्र्यांचा अड्डा झाला आहे.
विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, उद्घाटनानंतर नवीन सभागृहात कामकाज सुरु होणे अपेक्षित होते. परंतु, वेळेत काम पूर्ण न केल्याने ही इमारत भटक्या कुत्र्यांचे हक्काचे स्थान झाले आहे. पुणेकर भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे हैराण झाले असताना आता ही भटकी कुत्री थेट महापालिकेच्या नवीन सभागृहात पोहचली आहेत. आता विलंब न लावता तातडीने नवीन सभागृहात कामकाज सुरु करावे.