पुण्यात उंदरे वाढल्याने कुत्र्यांची नसबंदी बंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 09:02 PM2021-10-25T21:02:09+5:302021-10-25T21:03:04+5:30
पुणे : शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या आणि दहशत वाढत असताना, गेली सात महिन्यांपासून कुत्र्यांवरील शस्त्रक्रिया बंद आहेत. याकडे महापालिकेच्या ...
पुणे : शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या आणि दहशत वाढत असताना, गेली सात महिन्यांपासून कुत्र्यांवरील शस्त्रक्रिया बंद आहेत. याकडे महापालिकेच्या मुख्य सभेत सदस्यांनी लक्ष वेधले असता, यावर प्रशासनाने ऑपरेशन थिएटरमध्ये उंदरे वाढल्याने नसबंदी शस्त्रक्रिया बंद असल्याचे अजब उत्तर दिले. त्यामुळे नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी आता उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी मांजरे पाळायची का संतप्त प्रश्न उपस्थित केला.
शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मोठा ऐरणीवर आला आहे. अशावेळी महापालिका काय करत आहे, असे विविध प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. नगरसेवक सुभाष जगताप यांनी सन २०१४-१५ ला महापालिकेने नसबंदी केल्यानंतर पुढील चार पाच वर्षे संख्या वाढणार नाही, असे सांगितले होते. मग संख्या कशी वाढत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच नसबंदीचे काम जी संस्था मोफत काम करायला तयार आहे, त्यांना महापालिकेने प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली.
दरम्यान यावर स्पष्टीकरण देताना आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी, सध्या शहरात एक संस्था भटक्या कुत्रांच्या नसबंदीचे काम करत असल्याचे सांगितले. तसेच याकरिता आणखी एक निविदा काढली असून, पालिकेच्या ऑपरेशन थिएटरमध्येही लवकरच दुरुस्तीचे काम केले जाईल असे सांगितले.