ढोकसांगवी शाळेचे ‘आयएसओ’चे ढोंग उघड
By Admin | Published: June 10, 2015 04:51 AM2015-06-10T04:51:43+5:302015-06-10T04:51:43+5:30
शाळेला सहा वर्षांपासून मुख्याध्यापक नाही, इमारत मोडकळीस आलेली, गळकं छप्पर आणि महत्त्वाचं म्हणजे मुलींसाठी स्वच्छतागृहच नाही
प्रवीण गायकवाड, शिरूर
शाळेला सहा वर्षांपासून मुख्याध्यापक नाही, इमारत मोडकळीस आलेली, गळकं छप्पर आणि महत्त्वाचं म्हणजे मुलींसाठी स्वच्छतागृहच नाही, अशा आणि याहूनही अनेक गंभीर त्रुटी असताना तालुक्यातील ढोकसांगवी जिल्हा परिषद शाळेला मिळालंय आयएसओ प्रमाणपत्र!
विशष म्हणजे, या शाळेची पाहणी न करताच त्यांच्यावर ही मेहेरबानी करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांना आयएसओ ९००१ ते २००८ हे प्रमाणपत्र मिळाल्याचे समजल्यावर ‘लोकमत’ने यापैकी ढोकसांगवी जि.प. शाळेला भेट दिली. शाळेच्या दरवाजा नसलेल्या प्रवेशद्वारातच शाळेची ‘महती’ समजून आली. प्रवेशद्वाराच्या ठिकाणी प्रचंड चिखल व घाण आढळून आली. आत गेल्यानंतर प्रथम कळाले ते या शाळेला सहा वर्षांपासून मुख्याध्यापकच नाही. प्रमुख इमारतीच्या खिडक्या मोडकळीस आल्या आहेत. पावसाळ्यात शाळा गळते. जुन्या शाळेच्या मागील बाजूस नवीन इमारत उभी राहात असून ती अपूर्णावस्थेत आहे.
मुलींसाठी स्वच्छतागृह नाही, स्वतंत्र वाचनालय नाही, खेळण्याचे मैदानही नाही. आयएसओसाठी या सुविधा असणे बंधनकारक आहे. इतर निकषांमध्ये वस्तू-उपकरणे ठेवण्यासाठी एक ठिकाण असावे तेही या शाळेत नाही. नियोजन कृती तपासणीची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. या शाळेत मात्र तसे नाही. प्रत्येक वर्ग खोलीमध्ये एक फॅन, एक लाइट असणे अपेक्षित आहे. मात्र, सर्व वर्ग खोल्यांमध्ये तसे दिसून आले नाही. स्वयंपाकगृह दुरवस्थेत आढळून आले. पिण्याच्या पाण्याचे शीतयंत्र, शुद्धीकरण यंत्रणा देखील असावी, असा निकष आहे. मात्र, तशी सुविधा या शाळेत अस्तित्वात नाही. वायू, पाणी, धूळ, ध्वनीचे प्रदूषण नसावे, अशी अट आहे. मात्र, येथे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पाणी, धुळीचे प्रदूषण दिसून आले. वीज बचतीचे स्लो-गन लावणे अपेक्षित आहे. तेदेखील आढळून आले नाही. वाहनतळ असणे अपेक्षित आहे. मात्र, शाळेला वाहनतळ नाही. याप्रमाणेच आयएसओसाठी आणखीही अनेक निकष आहेत. एकंदरीत कोणत्याही परिस्थितीत ही शाळा आयएसओ मानांकनासाठी पात्र नाही, असे असताना या शाळेला आयएसओ दिले गेले, हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल.
तालुक्यातील जि.प. शाळा, ग्रामपंचायती तसेच अंगणवाड्यांना (ठरावीक) आयएसओ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. कोणतेही निकष न पाहता हे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
विभागीय आयुक्तांकडे चौकशीची मागणी
यात भ्रष्टाचार झाल्याचा संशय क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी व्यक्त केला व या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. प्रमाणपत्र देणारी संस्था व अधिकाऱ्यांवर पाचंगे यांनी रांजणगाव एसआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ढोकसांगवी जि.प. शाळेच्या पाहणीतून प्रमाणपत्र वाटपाचा बोगसपणा सिद्ध झालेला आहे.