मनाचे शरीरावर अधिराज्य - दृष्टिकोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:11 AM2021-05-23T04:11:31+5:302021-05-23T04:11:31+5:30
विराट युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण, अन्य पांडव व सैन्य बरोबर नसतानाही एकट्याने त्याने ज्या योद्ध्यांना नमविले तेच त्याचे मन ...
विराट युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण, अन्य पांडव व सैन्य बरोबर नसतानाही एकट्याने त्याने ज्या योद्ध्यांना नमविले तेच त्याचे मन ‘कमकुवत’ झाल्याने भारतीय युद्धात त्याच योद्ध्यांसमोर त्याला त्याचे धनुष्यदेखील पेलवले नव्हते. त्यावेळी तर सर्व सैन्य, पांडव व स्वत: भगवान श्रीकृष्ण त्याच्याबरोबर होते, तरीही!!!
आपण जो विचार करतो त्याप्रमाणे आपल्या मनातील विश्वास, पॅटर्नस् तयार होत असतात. मनातील ठाम विश्वासाला अनुसरून आपला दृष्टिकोन, एखाद्या गोष्टीकडे, घटनेकडे पाहण्याचा कल बनतो. दृष्टिकोन भावनेला जन्म देतो. भावनेतून मनातल्या मनातील आणि प्रत्यक्ष वाणीतले, बोलण्यातले शब्द तयार होतात. शब्दांनंतर प्रत्यक्ष कृती होते आणि सरतेशेवटी जशी आपली कृती असेल त्याप्रमाणे आपल्याला फलप्राप्ती होते, परिणाम प्राप्त होतात, रिझल्ट्स मिळतात.
आपला विचार, दृष्टिकोन सकारात्मक असेल, उच्च असेल, चांगला असेल तर कोणत्याही घटनेचा अथवा परिस्थितीचा नकारात्मक, वाईट परिणाम आपल्यावर होत नाही. जगात कोणतीही घटना किंवा परिस्थिती इतकी वाईट नसते की त्यापासून आपल्याला फायदा करून घेता येत नाही. त्यात काहीतरी चांगले असतेच.
चांगल्या, सकारात्मक दृष्टिकोनाचा, विचाराचा एक फायदा तर नक्कीच होतो की कोणत्याही चांगल्या वाईट परिस्थितीत आपले मन स्थिर व शांत राहू शकते. पुढील शारीरिक, मानसिक नुकसान टाळता येते.
आपल्याला इलेक्ट्रिक बल्बची देणगी देणाऱ्या सर थॉमस अल्वा एडिसन यांच्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीला एकदा प्रचंड आग लागली. त्यांचे जवळपास नऊ हजार संशोधनाचे कागद आगीत जळून खाक झाले. कोणीतरी त्यांना खबर दिली. ते आपल्या मुलाला घेऊन गेले. त्यांनी सर्व पाहिले. मुलाला सांगितले की, ‘जा, तुझ्या आईला घेऊन ये.’
एडिसन यांच्या पत्नीने ते दृश्य पाहिले व तिला चक्कर यायला लागली. एडिसनने तिचा हात धरला, शांत केले व आकाशाकडे दोन्ही हात उंचावत म्हणाले, ‘‘हे देवा तुझे आभार, माझ्या सर्व चुका जळून गेल्या.’’ केव्हढी स्थिरता! केव्हढा देवावर विश्वास! आणि आपण? खिशातून दहा रुपयांची नोट पडली तर पडली म्हणून अर्धा दिवस दु:खात काढतो. दृष्टिकोन, विचार महत्त्वाचा!
डॉ. बाख यांच्या मते कोणताही रोग, आजार हा दुष्ट किंवा क्रूर नसून नियतीने आपल्याला दिलेला एक संकेतच असतो. आपल्याकडून कोठेतरी, काहीतरी चूक नक्कीच झाली आहे किंवा होत आहे. विचारांची दिशा चुकल्याचे ते द्योतक आहे तसेच आपण पुढे आणखी मोठी चूक करू नये असेही जणू नियती आपणास सांगत असते. वेळीच सुधारा व पुढील धोका टाळा.
प्रत्येकामध्ये एक चांगला माणूस दडलेला असतो. त्याचे चांगले गुण म्हणजे एकाग्रता, शहाणपण, मानवता, चांगले हेतू, धैर्य स्थैर्य इ. होत. जर हे गुण त्याच्या व्यक्तिमत्त्वातून, आचरणातून प्रकट झाले नाहीत तर त्या विरोधी भावना, गुण दिसून येतात. उदा. क्रोध, लोभ, मोह, तिरस्कार, द्वेष, हाव, हेवा, क्रूरता, स्वार्थ, दुर्लक्ष, निष्काळजीपणा इत्यादी. बारकाईने पाहिल्यास या व इतर विरोधी भावनाच सर्व आजारांस कारणीभूत असतात असे दिसते.
(क्रमश:)