लस घेण्यापूर्वी करा रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:17+5:302021-03-17T04:11:17+5:30
पुणे : सध्या देशभरात लसीकरण प्रक्रिया सुरू आहे. लस घेतल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येणार नाही. दुसरा डोस घेतल्यानंतर ...
पुणे : सध्या देशभरात लसीकरण प्रक्रिया सुरू आहे. लस घेतल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येणार नाही. दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येणार आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरण करण्यापूर्वी नागरिकांनी आवर्जून रक्तदान करावे, असे आवाहन रक्तपेढ्यांकडून केले जात आहे.
आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक कर्मचा-यांसह आता ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांपुढील व्याधीग्रस्त व्यक्तींना तिस-या टप्प्यात लसीकरण करण्यात येत आहे. पुढील महिन्याभरात १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांसाठी लसीकरण सुरू होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सरसकट लसीकरण सुरू झाल्यावर अनेक नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करण्याची शक्यता आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना लसीकरण करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहेच; मात्र, आधी रक्तदानाचे कर्तव्य पार पाडून मग लसीकरणासाठी जावे आणि भविष्यातील रक्तटंचाई टाळण्यास हातभार लावावा, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
-------------------
* दररोज किती जणांना दिली जाते लस? - १० ते १२ हजार
* आतापर्यंत लसीकरण - १,२०,०००
* जिल्ह्यात एकूण ब्लड बँक - २५
---------------------
लसीकरणाआधी मी केले रक्तदान; तुम्हीही करा !
लसीकरण केल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येणार नाही, असे वैैद्यकशास्त्र सांगते. माझे वय ५३ आहे. मी आतापर्यंत २०८ वेळा प्लेटलेट दान केले आहे. निरोगी व्यक्ती दर १५ दिवसांनी प्लेटलेट दान करू शकते. प्लेटलेट दान केल्याने आपल्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. लोकांमध्ये रक्तदानाबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे लसीकरणाआधी जास्तीत जास्त नागरिकांनी सामाजिक बांधिलकी समजून आवर्जून रक्तदान करावे. मीही जनकल्याण रक्तपेढीमध्ये मंगळवारी प्लेटलेट दान करून आलो. आता लसीकरण करून घेणार आहे.
- स्वानंद समुद्र, रक्तदाते
-------------------------
सरसकट लसीकरण सुरू झाल्यावर रक्तदात्यांची संख्या कमी होईल आणि रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. लसीकरण केल्यावर किमान दोन महिने रक्तदान करता येणार नाही. तसेच दोन रक्तदानांमध्ये तीन ते चार महिन्यांचे अंतर आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन जास्तीत जास्त दात्यांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करावे.
- अतुल कुलकर्णी, जनकल्याण रक्तपेढी
--------------------------
सध्या ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्ती आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांचे लसीकरण सुरू आहे. सर्वसमावेशक लसीकरण सुरू व्हायला अजून थोडा वेळ लागेल. त्यावेळी रक्तदानावर परिणाम होऊ शकतो. रक्तपेढीमध्ये दररोज सरासरी ६ ते १० जण रक्तदानासाठी येतात. महिन्यातून दोन-तीन वेळा रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.
- सोनाली मराठे, पूना हॉस्पिटल ब्लड बँक