रक्तदान करा! पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तपेढ्यांमध्ये फक्त १ ते २ दिवसांचा रक्तपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:08 AM2024-11-27T11:08:28+5:302024-11-27T11:08:46+5:30
संपूर्ण पुण्यामध्ये दररोज १५०० रक्तपिशव्यांची गरज असते. त्यापैकी फक्त १०० ते २०० रक्तपिशव्या उपलब्ध होतात
पुणे : शहरात सध्या रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, रक्तपेढ्यांमध्ये फक्त १ ते २ दिवसांचा रक्तपुरवठा आहे. दिवाळीनिमित्त महाविद्यालयांना सुट्टी आणि नियमित रक्तदाते उपलब्ध नसल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कमी झालेली रक्तदान शिबिरे आणि डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या या परस्पर विराेधी परिस्थितीमुळे रक्ताची मागणी वाढली आहे, असे रक्ताचे नाते ट्रस्ट अध्यक्ष राम बांगड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दिवसभरात किमान ५० रक्तदात्यांची गरज असताना, फक्त १५-२० दातेच रक्तदान करत आहेत. संपूर्ण पुण्यामध्ये दररोज १५०० रक्तपिशव्यांची गरज असते. पण, त्यापैकी फक्त १०० ते २०० रक्तपिशव्या उपलब्ध होतात.
कोविडनंतर रक्तदान शिबिरांना बंधने आली. त्यामुळे अद्याप मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे घेण्यात आलेली नाहीत. तसेच लोकांमध्ये रक्तदानाबाबत जागरूकता कमी आहे. पूर्वी सामाजिक संघटना आणि महाविद्यालये मोठ्या प्रमाणावर शिबिरे आयोजित करायच्या. अलीकडे अशा उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग कमी होत आहे. त्यामुळे पुण्यात रक्ताचा मोठा तुटवडा आहे.
पुण्यात रक्ताचा तुटवडा ही गंभीर समस्या आहे. दर तीन महिन्यांला रक्तदान शिबिरे आयोजित केली पाहिजेत. त्यामुळे रक्ताचा साठा वाढेल आणि भविष्यातील संभाव्य तुटवडा रोखण्यास मदत होईल. प्रत्येक नागरिकाने स्वेच्छेने रक्तदान केले पाहिजे. - राम बांगड, अध्यक्ष, रक्ताचे नाते ट्रस्ट
दिवाळी आणि महाविद्यालय सुट्ट्यांमुळे पुण्यात रक्तसाठा कमी झाला आहे. ही परिस्थिती लवकरच सुधारेल. पुण्यातील नागरिकांनी रक्तदान करून या परिस्थितीत योगदान द्यावे. - संजीव भागवत, जनकल्याण रक्तपेढी