'बाळा'साठी रक्त देणाराही पोलिसांच्या रडारवर; २ डॉक्टरांसह शिपायास ३० मेपर्यंत पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 02:18 PM2024-05-28T14:18:40+5:302024-05-28T14:20:40+5:30

या गुन्ह्यात बिल्डरपुत्राच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी तिऱ्हाईत व्यक्तीच्या रक्ताचा नमुना आरोपींनी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याचा शोध घेण्यासह गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली हाेती...

Donor of blood for builder's son also on police radar; Sepoys along with 2 doctors in police custody till May 30 | 'बाळा'साठी रक्त देणाराही पोलिसांच्या रडारवर; २ डॉक्टरांसह शिपायास ३० मेपर्यंत पोलिस कोठडी

'बाळा'साठी रक्त देणाराही पोलिसांच्या रडारवर; २ डॉक्टरांसह शिपायास ३० मेपर्यंत पोलिस कोठडी

पुणे : आलिशान पोर्शे कार भरधाव चालवून तरुण-तरुणीच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार बाळाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी दुसरेच रक्त घेऊन बाळाच्या रक्ताचा पुरावा नष्ट करणाऱ्या दोन डॉक्टरांसह एका शिपायाला न्यायालयाने गुरुवारपर्यंत (दि. ३०) पोलिस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यात बिल्डरपुत्राच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी तिऱ्हाईत व्यक्तीच्या रक्ताचा नमुना आरोपींनी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याचा शोध घेण्यासह गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली हाेती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांनी ती मान्य करत आराेपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

श्रीहरी भीमराव हाळनोर (वय ३५, रा. बी. जे. वैद्यकीय मुलांचे वसतिगृह, मूळ रा. धाराशिव), अजय अनिरुद्ध तावरे (३८, रा. गीता सोसायटी, कॅम्प) आणि अतुल नामदेव घटकांबळे (३०, रा. सुंदरनगरी सोसायटी, सोमवार पेठ) अशी पोलिस कोठडीत रवानगी झालेल्या आराेपींची नावे आहेत.

त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर युक्तिवादादरम्यान सहायक सरकारी वकील ॲड. नीलेश लडकत व ॲड. योगेश कदम म्हणाले की, बाळाला न्यायालयीन प्रक्रियेत मदत होण्याच्या उद्देशाने आरोपींनी शासकीय पदाचा गैरवापर करून कट रचत त्याचा रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केला आहे. त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे केले? याबाबत त्यांच्याकडे चौकशी करायची आहे. बाळाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी कोणाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले? याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा असून, त्याचा शोध घेऊन या गुन्ह्यात अटक करायची आहे.

"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी

अपघाताचा गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्यातील पुरावा नष्ट करणे, शासकीय दस्तऐवजात फेरफार करणे, गुन्ह्याच्या अनुषंगाने बाळाला मदत करण्याच्या उद्देशाने कट रचण्याच्या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे, त्यादृष्टीने तपास करायचा आहे.

पुण्यात आणखी एक अपघात! भरधाव ट्रकने सिग्नलवर थांबलेल्या तीन महाविद्यालयीन तरुणांना उडविले

या गुन्ह्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याअनुषंगाने आरोपींच्या घराची झडती घेऊन पंचनामा करायचा आहे. त्यांच्या मोबाइलचे सायबर तज्ज्ञांमार्फत विश्लेषण करून त्याआधारे तपास करायचा आहे. ससून रुग्णालयातील डीव्हीआर जप्त करण्याचे काम सुरू असून, घटनेच्या दिवशी त्यांना भेटण्यासाठी कोण-कोण आले होते याचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याचा आरोपींकडे एकत्रित तपास करायचा आहे, असा युक्तिवाद ॲड. लडकत व ॲड. कदम यांनी केला.

 

Web Title: Donor of blood for builder's son also on police radar; Sepoys along with 2 doctors in police custody till May 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.