डीजेंचा धुमाकूळ नको; सण, जयंती यांचे पवित्र राखुया, मेधा कुलकर्णींचे आवाहन
By श्रीकिशन काळे | Published: April 21, 2024 03:15 PM2024-04-21T15:15:00+5:302024-04-21T15:15:23+5:30
डीजेवर थिल्लर गाणी वाजवून सणांना आणि उत्सवांना बीभत्स रूप दिले जात आहे
पुणे: रामनवमीला कोथरूड परिसरामध्ये मोठमोठ्या आवाजात हिंदी गाणी लावून नागरिकांना त्रास दिल्यामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांनी संबंधित तरूणांच्या ग्रुपचा डीजे बंद पाडायला लावला. यामध्ये नागरिकांचे हित पाहून त्यांनी हा निर्णय घेतला, परंतु, रामनवमीची यात्रा किंवा त्यात कोणताही अडथळा त्यांनी आणलेला नाही, त्यांनी खुद्द याविषयीचा खुलासा समाजमाध्यमावर केला आहे. मर्यादेपेक्षा अधिक आवाजातील डीजे बंदच झाले पाहिजेत आणि सणवार हे शांततेत साजरे करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
गेल्या दोन दिवसांपासून समाजमाध्यमावर डीजेमुक्त सण, महापुरूषांच्या जयंत्या साजरा करण्यासाठी नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. अनेक नागरिकांनी याविषयावर डीजे बंदीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, केवळ मुठभर लोकांच्या नाचगाण्यासाठी डीजेचा आवाज मोठा करणे चुकीचे आहे, असाही मतप्रवाह मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत आहे. केवळ पुण्यातच नव्हे तर इतर शहरांमध्ये देखील डीजेच्या आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी देखील डीजेचा आवाज बंदच करावा, अशी मागणी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये खासदार मेधा कुलकर्णी यांनी एका ठिकाणी डीजेचा आवाज खूप वाढल्याने तो बंद करायला लावला. त्यावर समाजमाध्यमांवर उलटसुलट चर्चा होऊ लागल्याने शनिवारी रात्री एक व्हिडिओ बनवून कुलकर्णी यांनी तो शेअर केला आहे. त्यात त्या म्हणाल्या, हल्ली प्रत्येक सणांना व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सगळीकडेच डीजेंचे धुमाकूळ सुरू आहे. या डीजेवर थिल्लर गाणी वाजवून सणांना आणि उत्सवांना बीभत्स रूप दिले जात आहे. यावर्षी श्रीराम नवमीच्या निमित्ताने एमआयटी कॉलेजच्या परिसरात डीजेच्या माध्यमातून लोकांना असह्य होईल, अश्या प्रकारे गाणी वाजवली जात होती. यावर सामान्य नागरीकांच्या तक्रारी मिळताच, मी तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर तिथली परिस्थिती पाहून पोलिसांना पाचारण केले. पण या घटनेचा विपर्यास करून सोशल मीडियाद्वारे चुकीच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या, त्यामुळे आज मी या घटनेची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत आहे. माझे सर्वांनाच आवाहन आहे की, आपण सर्वांनी सणांचे पवित्र राखूया आणि पुण्याच्या नागरिकांचे हित ही पाहूया. ध्वनीप्रदूषण टाळूया.’’
गोली मार भेजे में, खल्लास अशा प्रकारची गाणी रामनवमीला लावून बिभत्स नाच केला जात असेल तर त्याला विरोध करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. मला नागरिकांचे फोन आले आणि मी नागरिकांसाठी कायम तत्पर असते. म्हणून अशी गाणी लावून रामनवमी साजरे करणे योग्य नाही. - मेधा कुलकर्णी, खासदार
‘डीजेमुक्त’ सणाच्या मागणीला जोर
‘डीजेमुक्त सण’ अशा प्रकारचा ट्रेंड समाजमाध्यमावर पहायला मिळत आहे. कारण डीजेचा त्रास सर्वांनाच होतो. सर्व धर्मीयांच्या प्रत्येक सणाला आणि महापुरूषांच्या जयंतीला डीजेचा दणदणाट लावला जात आहे. याचा त्रास आता अनेकांना होऊ लागला आहे. काही ठिकाणी तर कानाचे पडदे फाटल्यानंतर रूग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. म्हणून डीजेमुक्त सण या मागणीला जोर धरू लागला आहे.