भिक नको आम्हाला अनुदान हवाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:19+5:302021-06-27T04:09:19+5:30
दहा रिक्षाचालकांनी आपले अनुदान केले परत लोकमत न्युज नेटवर्क पुणे : भिक नको अनुदान द्या, गुंडगिरी करणाऱ्या फायनान्स कंपनीवर ...
दहा रिक्षाचालकांनी आपले अनुदान केले परत
लोकमत न्युज नेटवर्क
पुणे : भिक नको अनुदान द्या, गुंडगिरी करणाऱ्या फायनान्स कंपनीवर कारवाई करा,अशा विविध घोषणा देत रिक्षा चालकांनी शनिवारी आपला संताप व्यक्त केला. यावेळी राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करीत १० रिक्षा चालकांनी १५०० रुपयांचे अनुदान सरकारला परत केले. बघतोय रिक्षावाला संघटनेच्या वतीने हे निदर्शने करण्यात आली.
कोरोना काळात रिक्षा चालकांना आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारने पंधराशे रुपयांची मदत केली. मात्र फायनान्स कंपनीचे हप्ते थकल्याने त्यांनी पंधराशे रुपये जमा होताच ते कट करून घेतले. ही मदत रिक्षा चालकांना न होता फायनान्स कंपनीला होत आहे. तेव्हा प्रातिनिधिक स्वरूपात 10 रिक्षा चालकांनी आपले अनुदान परत करीत १५०० रुपयांचा चेक जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केला आहे.
आम्हाला राज्य सरकारची मदत नको, असे बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी श्रीकांत चव्हाण, सचिन वैराट, आशिष ओपळकर, अप्पा हिरेमठ, अल्ताफ शेख , मायकल शिरसाठ, बळीराम घायाळ, संतोष नेवास्कर आदी उपस्थित होते.
------------
या मागण्यांचा विचार व्हावा
१) रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाची त्वरित स्थापना करावी.
२) लॉकडाऊन काळात आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी.
३) नवीन रिक्षा परमिट बंद करण्याच्या धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी.
४) उबेर व इतर कंपन्यांच्या बेकायदा बाईक टॅक्सी त्वरित बंद करावी.
५) अनुदान मिळण्याची प्रक्रिया सोपी करून त्यातले अडथळे दूर करावे व ज्या रिक्षाचालकांना फॉर्म भरुनसुद्धा अनुदान मिळाले नाही त्यांच्या तक्रारींची त्वरित दखल घ्यावी.