आदित्यदादा, राजगडावर रोपवे बांधू नका! पुण्यातील चिमुकलीचं थेट पर्यावरणमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 04:38 PM2021-06-21T16:38:10+5:302021-06-21T16:49:28+5:30
वेल्हा तालुक्यातील राजगडावर रोपवे तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयानंतर काही शिवप्रेमी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
पुणे : सध्या राजगडावर रोपवे बांधण्याच्या सरकारच्या निर्णयावरून इतिहासप्रेमी संघटना आणि राज्य सरकार यांच्यात नवा वाद उफाळून आला आहे. इतिहास प्रेमी संघटनांनी राजगडावर बांधण्यात येणाऱ्या रोपवे ला कडाडून विरोध दर्शविला आहे. मात्र, सरकारच्या याच निर्णयाला विरोध दर्शवितानाच पुण्यातील एका गडप्रेमी व ट्रेकर असलेल्या चिमुकलीने थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे पर्यावरणमंत्र्यांकडे तिने राजगड किल्ल्यावर रोपवे बांधू नका अशी मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार यासांरख्या विविध नेत्यांना पत्र लिहून चिमुकली मंडळी आपल्या भावना त्यांच्याकडे व्यक्त करताना आपण पाहिले आहे. पण यावेळी पुण्यातील एका चिमुकलीने थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनाच पत्र लिहिले आहे.या पत्राद्वारे पर्यावरण मंत्र्यांकडे तिने आपली कैफियत मांडली आहे. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वेल्हा तालुक्यातील राजगडावर रोपवे तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयानंतर काही शिवप्रेमी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले.पण पुण्यातील साईषा अभिजीत धुमाळ नावाच्या एका चिमुकल्या तरुणीने राजगडावरील रोपवे ला विरोध दर्शविला आहे. आणि रोप वेला विरोध दर्शविताना तिने आपली विरोधामागची भूमिका देखील मंत्री आदित्य ठाकरेंकडे स्पष्टपणे व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात साईषा म्हणते, माननीय आदित्यदादा यांना पत्रास कारण की, राजगडावर रोपवे बांधू नका. कारण गडावर आणि आजूबाजूला फुलपाखरु, हरण, मोर, ससे यांची घरं असतात. आपण गर्दी केली तर हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर काढू नका Please. मला ट्रेकिंगला गेल्यावर त्यांना लपून पाहायला, फुलपाखरांच्या मागे धावायला आवडतं. आपण त्यांना आपल्या घरी राहू देत नाही. मग त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर पाठवतो.
यानंतर पत्राच्या शेवटी ती एक छोटी गडप्रेमी आणि ट्रेकर असल्याचे देखील सांगते. तिने हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या पत्त्यावर पाठविले असून तिच्या पत्राला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे नेमकं काय उत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.