'मुलांनो कॉपी करू नका', बारावी परीक्षेतील गैरप्रकार राेखण्यासाठी २७१ भरारी पथके
By प्रशांत बिडवे | Published: February 20, 2024 03:27 PM2024-02-20T15:27:20+5:302024-02-20T15:28:08+5:30
गैरमार्गाशी लढा या अभियानांतर्गत काॅपीमूक्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रबाेधनही करण्यात आले आहे.
पुणे: बारावी परीक्षेतील गैरप्रकार कमी व्हावेत यासाठी यंदाही राज्य मंडळाकडून गैरमार्गाशी लढा हे अभियान राबविण्यात आले तसेच परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी मंडळातर्फे २७१ भरारी पथके नेमण्यात आले आहेत अशी माहिती अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिली.
गैरमार्गाशी लढा या अभियानांतर्गत काॅपीमूक्त परीक्षेसाठी स्थानिक दक्षता समिती व केंद्र स्तरावर सभा, पालकसभेचे आयाेजन, विद्यार्थ्यांचे प्रबाेधन करण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल हाेईल तसेच परीक्षेतील गैरप्रकारही कमी हाेण्यास मदत हाेणार आहे. राज्य मंडळाच्या २७१ भरारी पथकांशिवाय प्रत्येक जिल्ह्यांत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत आहे. तसेच विभागीय मंडळातही विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी द्याव्यात असे सांगण्यात आले आहे. पाेलीस आयुक्त, जिल्हा पाेलीस अधीक्षक यांनाही राज्यात काॅपीमुक्त अभियान राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान दहा शाळांना भेट अनिवार्य
प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व याेजना, सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांना प्रात्यक्षिक परीक्षा काळात कमीत कमी १० उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देण्याबाबत सूचित केले आहे.