व्यक्तिगत द्वेषातून पाटील यांच्यावर टीका नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:22 AM2021-01-13T04:22:04+5:302021-01-13T04:22:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असून अनेक ब्राह्मण कुटुंबांशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असून अनेक ब्राह्मण कुटुंबांशी त्यांचा संपर्क आहे. जाहीर सभेतील त्यांचे भाष्य इतिहासात आक्रमक पद्धतीने झालेल्या धर्मांतरावरचे होते. ब्राह्मण समाजाबद्दल अवमान करण्याचा विचारदेखील त्यांच्या मनात येणे शक्य नाही. मात्र व्यक्तिगत विद्वेषातून त्यांच्यावर टीका केली जात आहे, असल्याचे मत ब्राह्मण समाजातून व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग येथील सभेतील त्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे ब्राह्मणांचा अवमान झाल्याची भूमिका घेत काहींनी पाटील यांच्यावर टीका सुुरु केली आहे. यावर “मुळातच पाटील यांनी ब्राह्मण समाजाचा अवमान केल्याचे आम्ही मानत नाही. पाटील यांचया हितशत्रूंनी वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करु नये,” अशी भूमिका राज्यभरातील अनेक ब्राह्मण संघटना आणि व्यक्तींनी घेतली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील हे सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. ब्राम्हण समाजाचा मित्र म्हणून स्नेह आणि विश्वासाचे नाते ते नेहमी जपत असतात. सामाजिक जीवनात काम करत असताना त्यांनी अनेक ब्राह्मण कुटुंबियाकडे आपुलकीने वास्तव्य केले आहे. राहिले आहेत. तत्कालीन परिस्थितीत आक्रमक पद्धतीने झालेल्या धर्मांतराबद्दल त्यांनी सिंधुदुर्गातील सभेत भाष्य केले होते. कोणाचाही अवमान करण्याचा विचारही ते करु शकत नाहीत. भाषणातील वाक्यांचा विपर्यास करुन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
“गोविंद कुलकर्णी नामक अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांनी पत्रकाद्वारे ब्राह्मण समाज भाजपाला धडा शिकवेल अशी वल्गना केली आहे. मुळात गोविंदरावांना ब्राह्मण समाजाचे नेतृत्व कोणी दिले,” असा प्रश्न संदीप खर्डेकर यांनी उपस्थित केला. खर्डेकर म्हणाले की, ब्राह्मण समाजाचे स्वयंघोषित नेते म्हणून वावरताना ब्राह्मण संघटन किंवा ब्राह्मणांच्या समस्या मांडणे सोडून हे महाशय राजकीय भूमिका घेतात यातच त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. पुण्याच्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातून अनेक कार्यकर्ते बाहेर पडले आहेत. मी देखील यापुढे आपल्या सोबत काम करु इच्छित नाही, असे खर्डेकर यांनी म्हटले आहे.
चौकट
षडयंत्राचा संशय
“चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यातून सोईस्कर अर्थ काढत निरर्थक वाद निर्माण करायचा याला सुनियोजित षडयंत्राचा वास आहे. या विषयाचे भांडवल करुन द्वेष निर्माण करण्याचा प्रकार निषेधार्ह आहे.” -आमदार मुक्ता टिळक