अशैक्षणिक कामे नकाे, विद्यार्थ्यांना शिकवू द्या! आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा माेर्चा

By प्रशांत बिडवे | Published: December 27, 2023 08:05 PM2023-12-27T20:05:49+5:302023-12-27T20:06:12+5:30

पदाधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्यासाेबत विविध मागण्यांसंदर्भात चर्चाही केली....

Don't do non-academic work, let the students teach! Teachers' march on Commissioner's office | अशैक्षणिक कामे नकाे, विद्यार्थ्यांना शिकवू द्या! आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा माेर्चा

अशैक्षणिक कामे नकाे, विद्यार्थ्यांना शिकवू द्या! आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा माेर्चा

पुणे : ‘शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे बंद करा आणि शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी मुलांना शिकवू द्या’ अशी मागणी करीत राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २७) शिक्षण आयुक्तालयावर माेर्चा काढला. पदाधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्यासाेबत विविध मागण्यांसंदर्भात चर्चाही केली.

पुण्यातील शनिवारवाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालयावर काढलेल्या या माेर्चात राज्यभरातून २४ प्राथमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले हाेते. आरटीई २००९ नुसार ६ ते १४ वयाेगटातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी प्राधान्य दिलेले आहे. मात्र, त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांवर अशैक्षणिक कामे साेपविली जात आहेत. त्यात शिक्षकांचा वेळ जात आहे. यासह निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे वेळाेवेळी आदेश दिले जात आहेत.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास प्राधान्य देत शिक्षक संघटनांनी अशैक्षणिक कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणाचे काम स्वतंत्र यंत्रणेकडे साेपविण्यात यावे तसेच शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम करू द्यावे. काेणत्याही अशैक्षणिक कामासाठी शिक्षकाचा वापर करू नये, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

याचबराेबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन याेजना लागू करावी. राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत. स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमावी आदी मागण्याही यावेळी केल्या. माेर्चाचे नेतृत्व राज्याध्यक्ष केशवराव जाधव, सरचिटणीस राजेश सुर्वे, कल्याण लवांडे, प्रसाद पाटील, बिपीन साळवे, यादव पवार, अर्जुन काेळी, साजिद पटेल, चिंतामण वेखंडे, स्मिता साेनी यांनी केले.

Web Title: Don't do non-academic work, let the students teach! Teachers' march on Commissioner's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.