Pune: पुण्यात रात्रीची ड्रायव्हिंग नकाे रे बाबा! रात्री सर्वाधिक प्राणघातक अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 09:38 AM2023-11-24T09:38:28+5:302023-11-24T09:38:53+5:30
पुणे शहरात सर्वाधिक प्राणघातक अपघात रात्री ११ ते पहाटे १ याच दरम्यान झाले आहेत....
पुणे : रुंदीकरणामुळे प्रशस्त झालेले आणि सिमेंटचे रस्ते... रात्रीची वेळ असल्याने सिग्नल बंद आणि वाहनांची संख्या तुरळक...अशावेळी वाहनांचा वेग वाढतो आणि चालकाचे नियंत्रण सुटून प्राणघातक अपघात होतात. हेच वाहतूक पाेलिसांच्या विश्लेषणातून समाेर आले असून, पुणे शहरात सर्वाधिक प्राणघातक अपघात रात्री ११ ते पहाटे १ याच दरम्यान झाले आहेत.
पुणे पोलिसांच्या रोड क्रश डेटा विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. पुणे पोलिस आणि जागतिक आरोग्य संस्थेच्या व्हायटल स्टॅटेजीजच्या तांत्रिक सहयोगाने वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना दुष्परिणामाबाबत चेतावनी देणारी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना दुष्परिणामांबद्दल इशारा देणारी मोहीम सुरू केली आहे. त्यात ही माहिती देण्यात आली. पुढील चार आठवडे ही माेहीम राबविण्यात येणार आहे. याबाबत शहरातील सर्व सिनेमागृहात ३० सेकंदांची एक चित्रफीत दाखवण्यात येणार आहे.
जीवघेणे अपघाताची वेळ काय?
शहरात २०२२ मध्ये झालेल्या अपघातांत एकूण ३२७ जणांचा मृत्यू झाला. यात ७५ मृत्यू हे रात्री ११ ते १ च्या दरम्यानच्या अपघात झाले आहेत. रात्रीच्या वेळी रस्ता रिकामा असतो. त्यामुळे अजाणतेपणे वाहनांचा वेग वाढतो. त्यात अनेकदा रस्त्यांमध्ये अचानक अडथळा, खड्डे अशा वेगवेगळ्या कारणामुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटते आणि अपघात होत असल्याचे दिसून आले आहे.
यंदा अपघातात वाढ :
यावर्षी १ जानेवारी ते २२ नोव्हेंबर दरम्यान पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १०७७ अपघात झाले. त्यात २९३ प्राणघातक अपघातात ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. ५४० गंभीर अपघात झाले असून, त्यात ६०६ जण गंभीर जखमी झाले आहेत, तर १३० अपघातामध्ये १६३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ११४ अपघातात विनादुखापतीची नोंद झाली आहे.
पुणे शहरातील अपघात २०२२
एकूण अपघात - ९७८
प्राणघातक अपघात - ३०९
एकूण मृत्यू - ३२७
पादचारी मृत्यू - १०६
दुचाकीस्वाराचा मृत्यू - १८७
कार पॅसेंजर मृत्यू - ८
इतर मृत्यू - २६
रात्री ११ ते १ मध्ये मृत्यू - ७५
गेल्या काही वर्षांत रस्त्यावरील वाहनांचा वेग हा प्राणघातक आणि गंभीर दुखापतींसाठी कारण ठरत आहे. रस्ते अपघातात आलेला अचानक मृत्यू हे कुटुंबाला भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या अपंग करत असतात.
- रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर
रस्ते रिकामे असतात तेव्हा वाहनांचा वेग वाढतो आणि अपघात होतात. यामुळे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या मोहिमेद्वारे वाहनांचा वेग कमी करण्याचे ध्येय आहे.
- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त (वाहतूक)