लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:11 AM2021-07-31T04:11:23+5:302021-07-31T04:11:23+5:30
पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुलांची अधिक काळजी घेण्याचे आवाहन ुबालरोगतज्ज्ञांकडून केले जात आहे. सध्या बदलते ...
पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुलांची अधिक काळजी घेण्याचे आवाहन ुबालरोगतज्ज्ञांकडून केले जात आहे. सध्या बदलते हवामान, हवेतील आर्द्रता, विषाणूंचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे मुलांमध्ये फ्लूसदृश आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्दी, ताप, अंगदुखी अशी लक्षणे दिसल्यास आजार अंगावर काढू नये आणि त्वरित उपचार सुरू करावेत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आणि तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अद्याप लस उपलब्ध नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचा अंदाज बांधला जात आहे. सध्या मुलांमध्ये फ्लूचे प्रमाण वाढले असून, खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागात बालरुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये ताप आलेल्या मुलांची संख्या जास्त आहे.
इन्फ्लूएंझाची आणि कोरोनाची लक्षणे काहीशी सारखीच असल्याने मुलांना ताप आला तरी पालकांची चिंता वाढत आहे. प्रत्येक ताप कोरोनाचेच लक्षण असेल असे नाही. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये, मात्र अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. मुले वर्षातून दोन-तीन वेळा हमखास आजारी पडतात. त्यामुळे मुलांची ठरावीक औषधे घरोघरी असतातच; मात्र सध्याच्या काळात कोरोनाप्रमाणेच डेंग्यू, चिकुनगुनिया या आजारांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे मुलांवर घरच्या घरी उपचार करण्यावर भर न देता मुलांना डॉक्टरकडे घेऊन जावे आणि त्यांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करावे. त्यांनी सांगितलेल्या चाचण्या करून घ्याव्यात.
-------------------
कोरोनाचे एकूण रुग्ण - ४८६९०५
सक्रिय रुग्ण - २५७७
१५ वर्षांखालील रुग्ण - २६,४८८ (१ मार्च ते १६ जून या कालावधीतील आकडेवारीनुसार)
--------------------
लहान मुलांसाठी जिल्ह्यातील खाटांचे नियोजन
एकूण उपलब्ध बेड्स - ६,१५६
ऑक्सिजन विरहित बेड - ३,०२०
ऑक्सिजन बेड - २,२३८
आयसीयू बेड - ६०२
व्हेंटिलेटर - ३०५
-----------------
एकूण - १२,३२१
-----------------
घाबरू नका, काळजी घ्या !
बहुतेक मुलांमध्ये सौम्य ताप, खोकला, सर्दी, उलट्या-जुलाब, चिडचिडेपणा, अंगदुखी आणि थकवा अशी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे सामान्यत: हंगामी फ्लूची आहेत. फॅमिली फिजिशियन किंवा बालरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अशी लक्षणे असणाऱ्या मुलांना पॅरासिटामोल किंवा अन्य साधी औषधी दिली जातात. पालकांनी घरात लक्षणांबाबतचा चार्ट तयार करावा आणि डॉक्टरांशी शेअर करावा. मुलांना संतुलित आहार, दररोज व्यायाम आणि सकारात्मक विचार यांची सवय लावावी.
- डॉ. मानसी थत्ते, बालरोगतज्ज्ञ