"नवीन व्हेरिएंटला घाबरू नका पण खबरदारी म्हणून काळजी घ्या", आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 09:12 PM2022-12-22T21:12:01+5:302022-12-22T21:13:15+5:30
नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने भारतातही रुग्णवाढीबाबत आणखी एका लाटेबाबत तर्कवितर्क लावले जातायेत
पुणे : चीनसह ब्राझील, अमेरिका व जपानमध्ये काेराेनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच भारताचा शेजारी चीनमध्ये तर बीएफ.७ या नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने भारतातही रुग्णवाढीबाबत तसेच आणखी एका लाटेबाबत तर्कवितर्क लावले जात असताना तज्ज्ञांनी मात्र, या व्हेरिएंटचा देशाला धाेका नसल्याचे सांगितले आहे. तरी खबरदारी म्हणून काळजी घ्यावी असा सल्ला मात्र दिला आहे.
याबाबत अधिक माहीती देताना राज्याचे साथराेग सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदीप आवटे म्हणाले की, भारतात राज्यातही काेराेना रुग्णांची संख्या घटत आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवडयात ३० टक्यांनी रुग्ण कमी झाले आहेत. तर, केवळ १६ रुग्णांना दाखल करावे लागले आहे. चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेला बीएफ.७ व्हेरिएंट हा ओमायक्राॅनचा एक उपप्रकार आहे. त्याचे दाेन रुग्ण आपल्याकडे जुलै आणि ऑक्टाेबरमध्ये आढळून आले व ते बरेही झाले. त्याचा प्रसार इतर राज्यांत काेठेच झालेला नाही. म्हणजेच ताे व्हेरिएंट आपल्याकडे वाढू शकला नाही यावरून आपल्याला सध्या तरी त्याची काही भिती नाही. परंतू, आपल्या आराेग्य यंत्रणेकडून काेणताही हलगर्जीपणा हाेउ नये म्हणून आपण त्याबाबत खबरदारी घेत आहाेत, असे डाॅ. आवटे यांनी स्पष्ट केले.
चीनमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण वाढतायेत व भारतात नाही याबाबत विचारले असता डाॅ. आवटे म्हणाले की, चीनमधील आकडेवारीबाबत निश्चित सांगता येत नाही. तसेच त्यांनी घेतलेली लस पूर्ण वेगळी आहे. तेथील नागरिकांची प्रतिकारशक्ती, त्या देशातील वातावरण हे वेगळे आहे त्यामुळे कदाचित तेथे वाढत असावा,असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच रुग्णसंख्या कमी झाल्याने पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या नमुन्यांमध्ये वेगळा व्हेरिएंट तर नाही ना हे पाहण्यासाठी सर्वच पाॅझिटिव्ह रुग्णांचे जनुकीय क्रमनिर्धारण करावे, असे आराेग्य विभागाने अवलंबले असल्याचेही त्यांनी सांगितले.
''आपल्याकडे सध्या एकुण काेराेना रुग्णांपैकी एक्सबीबी व्हेरिएंटचे ७० टक्के, बीए.२.७५ व्हेरिएंटचे २५ टक्के तर बीए.५ व त्याचे उपप्रकारचे प्रमाण २ ते ४ टक्के आहे. तर चीनमधील बीएफ.७ हा भारतात येउनही वाढला नाही त्यामुळे जाेपर्यंत व्हेरिएंटमध्ये फार बदल हाेत नाही ताेपर्यंत भितीचे कारण नाही व ताे शाेधण्यासाठी आपण सर्वच पाॅझिटिव्ह रुग्णांचे जिनाेम सिक्वेन्सिंग करत आहाेत. - डाॅ. राजेश कार्यकर्ते, राज्य समन्वयक, जिनाेम सिक्वेन्सिग विभाग''
''समाजमाध्यमांवरील माहीती चुकीची व भितीदायक असून त्यावर विश्वास ठेवू नये असे अवाहन करत डायबेटिस, रक्तदाब, किडणीविकार असलेल्या नागरिकांनी गर्दीत जाताना मास्क लावावा, लस घेतली नसल्यास घ्यावी व काेराेना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. - डाॅ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी''
राज्यातील काेराेना सदयस्थिती :
- गुरूवारी ११ रुग्ण बरे हाेउन घरी गेले, २० नव्या रुग्णांचे निदान झाले, दाेन जणांचा मृत्यू
- सध्या राज्यात १३४ सक्रिय काेराेना रुग्ण